कर्करोगाशी लढलेली सुंदर मॉडेल
By Admin | Published: April 12, 2017 12:38 AM2017-04-12T00:38:08+5:302017-04-12T00:38:08+5:30
पेटोन लिनाफेल्टर या शाळकरी मुलीला १६ व्या वाढदिवशी अंडाशयाचा कर्करोग (ओव्हरीयन कॅन्सर) झाल्याचे व तोही चौथ्या पायरीला पोहोचल्याचे निदान झाले.
- पेटोन लिनाफेल्टर या शाळकरी मुलीला १६ व्या वाढदिवशी अंडाशयाचा कर्करोग (ओव्हरीयन कॅन्सर) झाल्याचे व तोही चौथ्या पायरीला पोहोचल्याचे निदान झाले. ही बाब अमेरिकेच्या वैद्यकीय इतिहासात अगदीच धक्कादायक होती. सध्या ती सुंदर मॉडेल बनण्यासाठी या आटोकाट प्रयत्न करीत आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अंडाशयाचा कर्करोग महिलांना सामान्यत: वयाच्या पन्नाशीत होतो. मॉडेलिंगसाठी सुंदर, आकर्षक चेहऱ्यांच्या शोधात असलेल्यांना टेलर स्विफ्ट कार्यक्रमात पेटोन सापडली. त्यावेळी ती १५ वर्षांची होती व यामुळे तिच्याकडे फॅशनचे छान करीअर येऊ घातले होते. बार्बाडोसमध्ये ती कुटुंबियांसोबत पर्यटनाला गेली असता तिच्या ओटीपोटाला सूज येऊन असह्य वेदना होऊ लागल्या. ही सूज एवढी वाढली की पेटोन पाच महिन्यांची गरोदर दिसू लागली. डॉक्टरांना प्रारंभी तिच्या अंडाशयात गळू असावा, असे वाटले. परंतु पेटोन एके दिवशी स्नान करताना कोसळली. त्या दिवशी तिचा १६ वा वाढदिवस होता व ती चौथ्या पायरीवरच्या कर्करोगाची रुग्ण बनली. कर्करोग तिच्या ओटीपोटात व फुफ्फुसात गेला व गेल्या मे महिन्यात तिच्यावर केमोथेरपी सुरू झाली. केमोथेरेपीत केस झडण्याची तिला फार मोठी भीती होती. शस्त्रक्रियेमुळे तिच्या पोटावर मोठा चट्टा निर्माण झाला व त्यामुळे तिला आपले मॉडेलिंगचे करीअर सुरू व्हायच्या आधीच संपले, असे वाटले.
पिटोनच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली व गेल्या डिसेंबरमध्ये ती कर्करोगमुक्त झाल्याचे जाहीर झाले. तेव्हापासून पिटोन कर्करोगाबाबत जागृती करणाऱ्या चित्रपटात दिसत आहे. युनिव्हर्सिटी आॅफ कोलोराडो हॉस्पिटलच्या सहकार्याने हा चित्रपट बनवण्यात आला आहे. अंडाशयाच्या कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असे पिटोन महिलांना आवर्जुन सांगते.