हिंदू असल्याने पाकिस्तानमध्ये तरुणीला नोकरी नाकारली ?
By admin | Published: May 29, 2015 11:16 AM2015-05-29T11:16:09+5:302015-05-29T12:55:42+5:30
पाकिस्तानमधील पेशावर येथे हिंदू असल्याने संध्या दास या तरुणीला नोकरी नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पेशावर, दि. २९ - मुंबईत मुस्लिम असल्याने एका तरुणाला नोकरी तर एका उच्चशिक्षित तरुणीला घर नाकारल्याची घटना समोर आली असतानाच पाकिस्तानमधील पेशावर येथे हिंदू असल्याने संध्या दास या तरुणीला नोकरी नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
पेशावरमध्ये पूर्वी हिंदूंची संख्या लक्षणीय असली तरी आता या शहरातील हिंदूची संख्या एका वस्तीपर्यंत रोडावली आहे. कालीबाडी येथील हिंदूंवर होणा-या अत्याचारासंदर्भात एका आंतरराष्ट्रीय वाहिनीच्या पत्रकाराने लेख लिहीला आहे. यामध्ये कालीबाडी परिसरात राहणा-या संध्या दास व तिच्या कुटुंबीयांची व्यथा मांडण्यात आली आहे. संध्या एमएससी असून तिने पेशावरमधील एका शाळेत नोकरीसाठी अर्ज केला होता. विशेष म्हणजे संध्या स्वतःदेखील याच शाळेची माजी विद्यार्थी आहे. मात्र हिंदू असल्याने संध्याला शाळेत नोकरी नाकारण्यात आली असा दावा तिच्या कुटुंबाने केला आहे. संध्याचे वडिल बिशन दास यांचा पेशावरमधील कॅटरिंगचा व्यवसाय असून त्यांना ह्रदयविकार आहे. यावर उपचारासाठी दास कुटुंबाकडे पैसे नाही व यात भर म्हणजे संध्याला नोकरीही नाकारण्यात आली. संध्या प्रमाणेच पेशावरमधील अन्य हिंदू तरुण - तरुणींनाही नोकरी नाकारण्यात आल्याचे सांगितले जाते. आम्हाला आता या परिसरात असुरक्षित वाटू लागल्याचे स्थानिक हिंदू रहिवाशांनी म्हटले आहे.