2018 मध्ये पदार्पण करण्यापूर्वी ‘या’ सवयी मोडाच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 12:49 PM2017-12-26T12:49:27+5:302017-12-26T13:58:30+5:30
२०१७ला अलविदा करण्याआधी आणि २०१८ची सुरुवात करण्याआधी आपल्या या काही वाईट सवयी मोडणं फार गरजेचं आहे.
मुंबई : दरवर्षाच्या सुरुवातीला आपण अनेक संकल्प करतो आणि दोनच आठवड्यात आपण विसरुनही जातो. आपण एखादी गोष्ट नियमित करतो म्हणजे त्या गोष्टीची आपल्याला सवय झालेली असते. आपल्याला काही वाईट सवयी असतात ज्या आपल्या आपल्यासाठी फार घातक ठरू शकतात. २०१८ या नववर्षात पदार्पण करताना या सवयी तुम्ही झटकायला हव्यात नाहीतर जे २०१७ वर्षात झालं तेच २०१८ मध्ये होईल. आगामी वर्षात या सवयी मोडायला हव्यात जेणेकरुन आपण अनेक धोक्यांपासून दूर राहु शकतो.
सोशल मीडियापासून थोडंसं दूर रहा
सोशल मीडियायापासून थोडंसं दूर रहा असं सांगितल्यानंतरच तुमचा थोडासा मुड ऑफ झाला असेल. कारण सोशल मीडिया ही सवय नसून व्यसन आहे. आणि कोणत्याही गोष्टीचं व्यसन हे वाईटच. त्यामुळे २०१८ मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला सोशल मीडियापासून दूर रहायला हवं. कारण सध्या सोशल मीडियाचा अवाका वाढलाय. फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, हाईक, स्नॅपचॅट, स्काईप अशी विविध माध्यमं आल्याने आपला दिवसातला बराचसा वेळ इकडची नोटीफिकेशन्स बघण्यात जातो. त्यामुळे २०१८ मध्ये प्रवेश करताना ही सवय मागे सोडूनच पुढे चला.
मल्टिटास्किंग आहात कि कामाचं अतिरिक्त लोड?
काहीजण प्रचंड स्मार्ट असतात. एकाच वेळी अनेक कामं हाताळण्याचं स्किल त्यांच्याकडे असतं. तुम्हालाही अशी सवय असेल तर २०१८ मध्ये जरा सावध रहा. कारण नुकताच एक अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामध्ये असं सांगण्यात आलंय की जगभरात केवळ २ टक्के माणसंच मल्टिटास्कींग असतात. जर तुम्ही त्या २ टक्क्यांमध्ये असाल चांगलंच आहे. पण जर वर्क लोड म्हणून तुम्ही एकाच वेळी भरपूर कामं करत असाल तर ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी घातक असू शकेल. त्यापेक्षा एक टू-डू लिस्ट तयार करून घ्या. वेळापत्रक तयार करून त्याप्रमाणे कामं केलीत तर कामं वेळेत पूर्ण होतील.
आणखी वाचा - 2017मध्ये भारतात हे आहे गुगलवर टॉप ट्रेंडींग आणि मोस्ट सर्च ?
नकारात्मक लोकांची साथ सोडा
आपल्या आजूबाजूला सकारात्मक विचार करत असलेल्या माणसांनाच स्थान द्या. कारण नकारात्मक विचार करणारी माणसं आपल्या आयुष्यातही नकारात्मकता पसरवत असतात. त्यामुळे नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांची २०१७ मध्येच साथ सोडा आणि सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांसोबतचा सहवास वाढवा.
स्वत:ची तुलना करणं सोडा
इतरांच्या यशावरून आपण आपली तुलना करू नये. हाताची प्रत्येक बोटं समान नसतात त्याचप्रमाणे प्रत्येकाची बुद्धीही समान नसते. कोणीतरी मागे-पुढे असतंच. त्यामुळे इतरांसोबत आपली तुलना करणं केव्हाही वाईटच. तुम्ही तुमची ध्येय ठरवा आणि पुढे जात रहा.
अपयशाची कारणं देणं टाळा
अपयश आलं की आपण कारणं शोधत बसतो. त्यामुळे पुढच्यावेळेसही यश मिळत नाही. म्हणूनच नेहमी कारणं देणं टाळा. कारणं देण्यापेक्षा आपली चुक सुधारून पुढे जात रहा. तरच नववर्षात तुम्ही काहीतरी साध्य करू शकाल.
झोपण्याआधी इलेक्ट्रॉनिक वस्तू हाताळणं टाळा
तुम्हाला शांत आणि गाढ झोप हवी असेल तर मोबाईल, लॅपटॉप, टॅब अशी इलेक्ट्रॉनिक वस्तू हाताळणं सोडलं पाहिजे. तुम्ही जर भरपूर वेळ या साधानांच्या संपर्कात राहत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होऊ शकेल. संपूर्ण दिवस चांगला जावा असं तुम्हाला वाटत असेल तर झोप गाढ आणि शांत व्हायला हवी आणि त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तू हाताळणं टाळायला हवं.
प्रत्येक गोष्टीला हो बोलणं टाळा
आपण प्रत्येकाशी चांगलं नातं टिकून राहावं याकरता प्रत्येकाच्या कामाला हो बोलत जातो. प्रत्येकाला मदत करायला जातो. पण प्रत्येकवेळी कामाच्या गोंधळात एकही काम धड होत नाही. त्यामुळे एक काम करताना एकच काम करा. प्रत्येक कामाला होकार देत बसलात तर एकही काम व्यवस्थित होणार नाही.