प्रेयसीला अंधारात भेटण्यासाठी इलेक्ट्रिशियन संपूर्ण गावाची बत्तीगुल करायचा; एक दिवस अचानक...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 02:48 PM2022-05-12T14:48:06+5:302022-05-12T14:49:53+5:30
संध्याकाळी अंधार पडल्यावर २ ते ३ तास गावात वीज नसायची; ग्रामस्थ वैतागले होते
पूर्णिया: बिहारमधील एक इलेक्ट्रिशियन संध्याकाळी संपूर्ण गावचा वीज पुरवठा खंडित करायचा. संध्याकाळी अंधारात प्रेयसीला भेटता यावं आणि याची कुणकुण कोणालाही लागू नये यासाठी इलेक्ट्रिशियन गावची वीज घालवायचा. अखेर एक दिवस इलेक्ट्रिशियनचं भांडं फुटलं आणि ग्रामस्थांनी त्याला रंगेहात पकडलं. पूर्णिया जिल्ह्यातील गणेशपूर जिल्ह्यात हा प्रकार घडला.
गणेशपूर गावचा वीजपुरवठा संध्याकाळी खंडित व्हायचा. संध्याकाळी अंधार पडल्यावर विशिष्ट वेळी २ ते ३ तासांसाठी वीज नसायची. विशेष म्हणजे यावेळी शेजारच्या गावांमध्ये मात्र वीज पुरवठा सुरळीत असायचा. त्यामुळे ग्रामस्थांना नेमकं काय होतंय ते कळेना. ग्रामस्थांना संशय आला. त्यांनी या सगळ्याच्या खोलात जाण्याचं ठरवलं आणि इलेक्ट्रिशियन रंगेहात पकडला गेला.
एकदा संध्याकाळी काही ग्रामस्थ जमले. आज काय तो सोक्षमोक्ष लावायचा याच तयारीनं सगळे एकत्र आले होते. जमलेल्या ग्रामस्थांनी स्थानिक सरकारी शाळा गाठली. तिथे इलेक्ट्रिशियन आणि त्याची प्रेयसी आढळून आले. यानंतर ग्रामस्थांनी इलेक्ट्रिशियनला ताब्यात घेतलं. मुंडण करून संपूर्ण गावात त्याची धिंड काढली.
प्रेयसीला भेटायची इच्छा व्हायची, तेव्हा आपणच गावचा वीजपुरवठा खंडित करायचो, अशी कबुली इलेक्ट्रिशियननं दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी इलेक्ट्रिशियन आणि त्याच्या प्रेयसीचं लग्न लावून दिलं. यावेळी सरपंच आणि ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.