'ही' महिला मजबुरीने बनली इलेक्ट्रिशियन, आता दररोज कमावते इतके पैसे!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 03:54 PM2022-06-27T15:54:34+5:302022-06-27T15:55:34+5:30
bihar electrician woman success story : सीतादेवी यांचे पती आजारी पडल्यावर त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिले. पण, त्यांनी हार मानली नाही आणि अभ्यास न करता मेहनतीच्या बळावर त्या यशस्वी इलेक्ट्रिशियन बनल्या.
गया : मजबुरी आणि गरिबी माणसाला खूप काही शिकवते. अशीच एक घटना बिहारच्या गया जिल्ह्यातून समोर आली आहे. जी लाखो लोकांना प्रेरणा देईल. जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सीतादेवी यांचे पती आजारी पडल्यावर त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिले. पण, त्यांनी हार मानली नाही आणि अभ्यास न करता मेहनतीच्या बळावर त्या यशस्वी इलेक्ट्रिशियन बनल्या.
आता गेली 15 वर्षे गयाच्या राय काशीनाथ मोड येथे बसून त्या सर्व इलेक्ट्रिकल काम करत आहे. यासोबतच त्या आपल्या आजारी पतीवर उपचार करत आहेत. सीता देवी यांनी सांगितले की, 1985 पासून त्यांचे पती फूटपाथवर बांधलेल्या दुकानात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचे. 2005 मध्ये त्यांची प्रकृती खालावली, त्यामुळे कामावर परिणाम होऊ लागला. काही दिवसांनंतर त्यांची प्रकृती काम करण्यास सक्षम नव्हती. मजुरांनी पैसे मागायला सुरुवात केल्यावर सीतादेवीने स्वतः दुकान चालवण्याचा निर्णय घेतला.
सीतादेवी आपल्या आजारी पतीसोबत दुकानात येऊ लागल्या आणि स्वतः LED बल्ब, पंखा, कुलर, इन्व्हर्टर दुरुस्ती इत्यादी सर्व कामे शिकून घेतली. हळूहळू सीतादेवीच्या पतीची दृष्टीही गेली आणि ते घरी राहू लागले. मात्र सीतादेवी काम शिकून त्या पुढे दुकानात जाऊ लागल्या. शिक्षित नसलेल्या सीतादेवी आता इलेक्ट्रिशियन बनून एका दिवसात एक हजार ते पंधराशे रुपये कमावतात. या पैशातून त्या घराचा आणि पतीच्या उपचाराचा सर्व खर्च करत आहेत.
परिसरातील काही महिलांना सीतादेवी यांनी काम करणे, हे आवडले नाही. तर अनेक महिला या मेहनती इलेक्ट्रिशियन सीतादेवी यांचे कौतुक करतात. मात्र, या सर्व गोष्टींना मागे टाकून आज आत्मनिर्भर झाल्याचे सीतादेवी सांगतात. तसेच, अशिक्षित राहून जेव्हा आत्मनिर्भर होऊ शकते, तेव्हा सुशिक्षित महिलाही आपले ध्येय गाठू शकतात, असे त्या म्हणाल्या. याचबरोबर, सीतादेवी यांच्या यशाने खूप खूश आहे. ती माझ्यासोबतच घराचीही काळजी घेते आणि दुकानही उत्तम प्रकारे चालवते. तिचे ग्राहकांसोबतचे वागणे देखील अतिशय सौहार्दपूर्ण आहे, असे सीतादेवी यांचे पती जितेंद्र मिस्त्री यांनी सांगितले.