Tiger News:नेपाळची वाघीण अन् भारताचा वाघ; प्रेमसंबंधांत अडसर होणाऱ्या बछड्याचा घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 02:34 PM2022-01-07T14:34:02+5:302022-01-07T14:36:24+5:30
Tiger News: वाघिणीच्या प्रेमापोटी वाघाने दुसऱ्या वाघाला मारल्याची ही पहिलीच घटना घडली आहे.
तुम्ही अनेकदा प्रेमात अडथळा आल्याने प्रेमी युगूलांकडून इतरांचा खून झाल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. पण, प्राण्यांमध्येही अशी घटना घडली तर...? बिहारच्या सीमावर्ती भागात अशाच प्रकारची घटना घडली आहे. नेपाळच्या वाघिणीच्या प्रेमापोटी भारताच्या वाघाने आठ महिन्यांच्या मादी पिल्लाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. वाघ आणि वाघिणीच्या मेटिंगमध्ये हे पिल्लू अडथळा ठरत होते, त्यामुळेच वाघाने त्याला आपल्या मार्गातून दूर केले.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पात ही घटना घडली आहे. काळेश्वर मंदिराच्या कंपाऊंड क्रमांक टी-1 मध्ये पिलाचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. सोनहा नदीच्या काठावर वसलेले हे ठिकाण नेपाळ सीमेवर आहे. सोनहा नदी दोन्ही देशांच्या सीमांना विभाजित करते. तिथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी 8 महिन्यांच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला. शावकाचा अचानक मृत्यू झाल्याने वनविभाग सतर्क झाला, विभागाने एक पथक तयार करून मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू केला आहे.
मेटींगमध्ये अडथळा
वनसंरक्षक हेमकांत राय यांनी सांगितले की, 3 आणि 4 जानेवारी रोजी या भागाजवळ वाघिणीचे दर्शन झाले होते. ती वाघिण नेपाळची असल्याचे आढळून आले. त्याचवेळी या परिसरात एक भारतीय वाघही दिसला होता. वाघ आणि वाघिण मेटींग करत होते, पण यात शावक अडथळा ठरत होता. त्यामुळेच वाघाने त्या पिलाला मारुन टाकले.
वाघिण नेपाळच्या दिशेने गेली
व्हीटीआरचे संचालक कम मुख्य वनसंरक्षक हेमकांत राय संपूर्ण टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि पिलाचा मृतदेह सुरक्षित सापडल्याची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी पिलाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली आहे. मृत शावकाच्या मानेवर आणि डोक्यावर दातांच्या आणि नखांच्या खुणा आहेत. इतर शरीरावर कोणतीही जखम किंवा जखमेचे चिन्ह दिसत नाही. या जखमांवरुन त्या वाघाच्या पिलाला दुसऱ्या मोठ्या वाघाने ठार केल्याचा अंदाज लावण्यात आला आहे.