मालकाचा जीव वाचवण्यासाठी श्वान सापाला भिडला; मालक बचावला, पण श्वान दगावला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 04:12 PM2022-04-29T16:12:34+5:302022-04-29T16:16:24+5:30
याला म्हणतात प्रामाणिकपणा! मालकासाठी श्वानानं स्वत:चा जीव धोक्यात घातला
मधुबनी: बिहारच्या मधुबनीमध्ये एका श्वानानं मालकाचा जीव वाचवला आहे. मालकाचे प्राण वाचवण्यासाठी श्वानानं स्वत:चा जीव धोक्यात घातला. या श्वानाच्या प्रामाणिकपणाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
बुधवारी रात्री उशिरा हार्डवेअर व्यवसायिक आदित्य सिंह त्यांच्या रांटी येथील घरात बसले होते. वीज पुरवठा खंडित झाल्यानं परिसरात अंधार होता. आदित्य यांच्या शेजारीच त्यांचा चिंकी नावाचा पाळीव श्वान बसला होता. त्याचवेळी आदित्य यांना फुत्कार टाकल्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी टॉर्चच्या मदतीनं आसपास पाहिलं. मात्र काहीच दिसलं नाही.
थोड्या वेळात फुत्काराचा आवाज आणखी वाढू लागला. आदित्य यांनी टॉर्चच्या मदतीनं पुन्हा आसपास पाहिलं. त्यावेळी तीन फूट अंतरावर त्यांना एक साप दिसला. सापाला पाहून आदित्य यांची घाबरगुंडी उडाली. ते खुर्चीवरून खाली पडले.
आपल्या मालकाच्या संरक्षणासाठी चिंकीनं सापावर हल्ला चढवला. सापानं श्वानाला वेटोळे घातले. दोघांमध्ये बराच वेळ संघर्ष चालला. आदित्य यांनी पत्नीला बोलावलं. काठीनं सापाला तडाखे देत त्यांनी चिंकीची सुटका करण्याचा प्रयत्न केला. साप मरत नाही, तोपर्यंत चिंकीनं सापाला सोडलं नाही. सर्पदंशानं घायाळ झालेल्या चिंकीचा श्वास थोड्याच वेळात थांबला. मात्र आपल्या मालकाला जीव त्यानं वाचवला होता.