सात लाख खर्चून नॅनोचे केले हेलिकॉप्टर, बिहारमधील तरुण ठरतोय आकर्षणाचे केंद्रबिंदू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 03:40 AM2019-08-13T03:40:29+5:302019-08-13T03:40:46+5:30
हेलिकॉप्टरसारखी दिसणारी ही कार सध्या छापरामध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
छापरा (बिहार) : हेलिकॉप्टरचे डिझाईन करण्याची आणि ते चालविण्याची इच्छा पूर्ण करू न शकलेल्या मिथिलेश प्रसाद (२५, रा. छापरा) याने त्याच्याकडील टाटा नॅनो कारला ती हेलिकॉप्टरसारखी दिसेल, असे स्वरूप दिले. हेलिकॉप्टरसारखी दिसणारी ही कार सध्या छापरामध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
मिथिलेशचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय हा पाईप फिटिंगचा. तो मूळचा बनियापूरमधील सिमारा खेड्याचा. त्याने हेलिकॉप्टरमध्ये ज्या मूळ गोष्टी असतात त्या टाटा नॅनो कारमध्ये समाविष्ट करून तिला हेलिकॉप्टरचे रूप दिले.
भलेही ही कार उडणारी नाही तरी पारंपरिक हेलिकॉप्टरसारखी (मेन रोटोर, टेल बूम आणि टेल रोटोर) ती दिसते. रोटोर्स आणि साईड पॅनल्सही रंगीत एलईडी लाईटस्ने बसवण्यात आले आहेत.
कारला पूर्णपणे हेलिकॉप्टरमध्ये रूपांतरित करण्यासाठी मिथिलेश आणि त्याच्या भावाला जवळपास सात महिने लागले. या कारचे हेलिकॉप्टरमध्ये रूपांतर प्रकल्प अमलात आणण्यासाठी सात लाख रुपयांची गुंतवणूकही त्यांना करावी लागली.
आपल्या या निर्मितीबद्दल बोलताना मिथिलेश म्हणाला, ‘मी स्वत: हेलिकॉप्टरची बांधणी करून ते उडवतोय, हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते; परंतु मला आर्थिक आधार नसल्यामुळे मी माझ्या कारचे रूपांतर ती हेलिकॉप्टरसारखी दिसेल, असे केले.’ (वृत्तसंस्था)
मोठा आनंद मिळतो
मिथिलेश प्रसादचे शिक्षण बारावी उत्तीर्ण. आपण हेलिकॉप्टर्स बनवावेत हे त्याचे नेहमीचे स्वप्न. तो हेलिकॉप्टर चालवू शकत नसला तरी आपली टाटा नॅनो हेलिकॉप्टर कार चालवताना त्याला मोठा आनंद आणि समाधान मिळते.