दुचाकीस्वाराची भिकाऱ्याला धडक; पोलिसांनी उचललं तेव्हा खिशात सापडले लाखो रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 10:44 AM2022-12-18T10:44:09+5:302022-12-18T10:44:23+5:30
एका भिकाऱ्याकडे एवढी मोठी रोकड कुठून आली याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका भिकाऱ्याचा अपघात झाला, मात्र त्याच्या खिशात पोलिसांना जे आढळले ते थक्क करणारे होते. शनिवारी एका दुचाकीस्वाराने भिकाऱ्याला धडक दिली. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने भिकाऱ्याची ओळख पटवण्यासाठी त्याच्याकडे सापडलेले पाकीट तपासले. तेव्हा त्यात लाखो रुपये रोख आढळून आले. हे पाहून पोलीस अधिकारीही आश्चर्यचकित झाले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भिकाऱ्याच्या खिशातून ३.६४ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत असं पोलिसांनी सांगितले. या सर्व नोटा २००० रुपयांच्या होत्या. गोरखपूरमधील पिपराइच येथे राहण्यास असलेला ५० वर्षीय शरीफ बौंक असे या भिकाऱ्याचे नाव आहे. त्याला ऐकू येत नाही. तो मुकबधीर असल्याचे पोलिसांनी म्हटलं. एका भिकाऱ्याकडे एवढी मोठी रोकड कुठून आली याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
पोलिसांनी रोख रक्कम जप्त केली
या भिकाऱ्याने काही चोरी केली आहे का, या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करत आहेत. अहवालात तपास अधिकारी मनोज कुमार पांडे यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, एका मूकबधीर भिकाऱ्याचा अपघात झाला आणि त्याच्याकडून ३.६४ लाख रुपये जप्त करण्यात आले. या अपघातात भिकाऱ्याच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या ही रक्कम पोलिसांकडे आहे.
एसएचओने या घटनेची माहिती नसल्याचे सांगितले. एवढी मोठी रक्कम पोलीस ठाण्यात आल्यावर कळले. सध्या ही रक्कम पोलीस ठाण्यातील मालखान्यात जमा आहे. आतापर्यंत कोणीही पैशांवर दावा करण्यासाठी आलेले नाही. अपघातापूर्वी तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त दिसत होता असं अहवालात असे म्हटले आहे.