डोक्यातील उवा काढण्यात मन रमतं, एका ब्लॉगरचा अजब छंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 05:47 PM2017-11-02T17:47:36+5:302017-11-02T18:16:06+5:30
केसात उवा असल्यास त्या माणसाची शारिरीक आणि मानसिक हानी होत असते.
ऑस्ट्रेलिया - कोणाला कशाची आवड असेल हे काही सांगता येणार नाही. जर तुम्हाला कोणी सांगितलं की एका महिलेला मुलांच्या डोक्यातील उवा काढायला फार आवडतात तर तुम्हाला नवल वाटेल ना. पण हे खरं आहे. ऑस्ट्रेलियातील एका महिला ब्लॉगरने असा खुलासा केला आहे की, तिला मुलांच्या डोक्यातील उवा काढायला फार आवडतात. त्याचप्रमाणे हे उवा काढणं फार आरोग्यदायी असून या क्रियेमुळे एकमेंकांसोबतचं नातं खुलत जातं.
मम्मामिया या ऑनलाईन पोर्टलसाठी लिहिताना मँडी नोलन या ऑस्ट्रेलियन ब्लॉगर लिहितात की, ‘एकदा एका अभयारण्यात जात असताना मला माकड दुसऱ्या माकडाच्या डोक्यातील उवा काढताना दिसलं. ते सारं दृष्य पाहून मलाही वाटलं की मीही उत्तम निट-पिकर (उवा काढण्यात माहिर) आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.’ त्या पुढे लिहितात की, ‘डोक्यात ठिकठिकाणी असलेल्या उवा शोधून त्यांना त्याचठिकाणी मारून टाकणं ही सुद्धा एक कला आहे. अत्यंत लहान काम आहे हे, मात्र याने फार समाधान मिळतं. हे थोडंसं विचित्र आहे पण, यातून मला फार आनंद वाटतो.’
डोक्यात उवा असणं नैसर्गिक आहे. पण त्या योग्यपद्धतीने काढल्या पाहिजेत. कारण आपल्या केसात वाढत जाणाऱ्या उवा आपल्यासाठी अत्यंत अहितकारक आहेत. त्यामुळे माणसं बधिरही होतात. वयाच्या चौथ्या ते अकरा वर्षांपर्यंत उवा होतात, मात्र आपल्या केसांची नीट काळजी नाही घेतली तर मोठ्या माणसांच्या केसातही उवा वाढत जातात.
पुढे मँडी म्हणतात की ‘उवा काढल्यामुळे संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. डोक्यातील उवा काढण्यासाठी आपण सगळे एकत्र येतो. उवा काढण्यासाठी आपण सारे एकत्र बसतो, त्यामुळे एकमेकांमध्ये संवाद होतात. त्यातून गप्पा रंगतात. त्यामुळे एकमेकांप्रती असलेलं नातं आणखी दृढ होत जातं.’ एवढंच नव्हे तर त्या सांगतात की त्यांच्या मुलांनाही उवा काढण्याचा कार्यक्रम फार आवडतो.
उवा जवळपास ३ मीमी पर्यंत आपल्या डोक्यात वाढतात. डोक्यातील त्यांची वाढ आपल्याला फार त्रासदायक असते. मात्र आपल्या केसांची व्यवस्थित काळजी घेतल्यास त्यांचा प्रादुर्भाव होत नाही. पण या ब्लॉगरने असा दावा केला आहे की, उवा काढणे हे आरोग्यासाठी फार हितकारक असतं.
आपल्याला हे ऐकूनच खराब वाटतंय पण काय करणार ज्याचा त्याचा छंद तो त्यांचा छंद.