मोदी, फडणवीस यांच्या नावे बोगस रेशनकार्ड!
By admin | Published: April 8, 2015 11:00 PM2015-04-08T23:00:38+5:302015-04-09T05:47:41+5:30
बुलढाण्यातील खामगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील,
मुंबई : बुलढाण्यातील खामगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावे बोगस रेशनकार्ड तयार करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ सदस्य पांडुरंग फुंडकर यांनी बुधवारी विधान परिषदेत केला. या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करू व त्यामध्ये दोषींना निलंबित करण्यात येईल, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केली.
फुंडकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा विषय उपस्थित केला. ते म्हणाले की, वेगवेगळ््या नेत्यांच्या नावाने बोगस रेशनकार्ड तयार केलेली असून अशी सहा हजार रेशनकार्ड निवडणूक काळात तयार करण्यात आली. स्थानिक तहसीलदार व कर्मचारी यांच्या संगनमताने हे घडले आहे. या रेशनकार्डांवर धान्य घेतले जात आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री बापट यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून प्राथमिक चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे जाहीर केले. (विशेष प्रतिनिधी)