बॉलीवूडकरांची ‘गॅलक्सी’च्या दारी धाव !
By Admin | Published: May 8, 2015 02:08 AM2015-05-08T02:08:08+5:302015-05-08T05:49:53+5:30
गुरुवारी सकाळी सलमानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले; पण घरातील दुसरा एकही सदस्य घराबाहेर दिसला नाही.
मुंबई : हिट अॅण्ड रन प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांनी व अभिनेत्रींनी सलमानची भेट घेण्यासाठी त्याचे गॅलक्सी अपार्टमेंट्स गाठले. सलमानला कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर कुटुंबीयांसह सर्व बॉलिवूडलासुद्धा धक्का बसला आहे. त्यामुळे सलमानला दिलासा देण्यासाठी बॉलीवूडच्या स्टार्सची रीघ लागली आहे.
गुरुवारी सकाळी सलमानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले; पण घरातील दुसरा एकही सदस्य घराबाहेर दिसला नाही. बुधवारी रात्री सलमान जेव्हा दिवसभर कोर्टात राहून जामीनावर घरी परतला होता, तेव्हापासून चाहत्यांनी घराबाहेर गर्दी केलेली दिसून आली. सलमानने खास सुरक्षेच्या कारणास्तव गुरुवारी सकाळपासून खासगी बाऊन्सर गॅलक्सी आवारात तैनात केले होते. शिवाय, दिवसभर सलमानचे कुटुंबीय त्याच्यासोबतीला घरीच असलेले दिसून आले. सलमानला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मिळाल्याचे कळताच बॉलिवूड सेलेब्सनी सलमानच्या घरी त्याची भेट घेण्यासाठी गर्दी केली. अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेत्री प्रीती झिंटा, ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा, निर्माता रितेश सिधवानी, अभिनेता सोनू सुद, अभिनेता करिश्मा कपूर, अभिनेता सुनील शेट्टी, अभिनेता चंकी पांडे, अभिनेत्री बिपाशा बसू, भाजपा प्रवक्त्या शायना एनसी, माजी आमदार बाबा सिद्दिकी आणि टीव्ही अभिनेता संतोष शुक्लासह अनेक सेलिब्रिटी सलमानला भेटण्यासाठी त्याच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचले. परंतु, सलमानची एक्स-गर्लफ्रेंड असलेल्या कतरिना कैफने मात्र सलमानविषयी काहीच माहिती करून घेतली नसल्याचे कळते आहे. (प्रतिनिधी)
> भाजपा खासदार हेमा मालिनी, राज बब्बर, सुप्रियो बाबूल, मनोज तिवारी अशा बॉलिवूडच्या अनेक आजी-माजी कलाकारांनी बुधवारपासून सलमानची तळी उचलून धरली आहे.
त्याला कमीतकमी शिक्षा व्हावी याकरिता प्रार्थना करीत असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. असे असतानाही राज व राणे यांनी सलमानची भेट घेतल्यावर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उभयतांवर तोंडसुख घेतले.
सलमानला न्यायालयाने दोषी ठरवल्यावर या दोघांनी त्याची भेट घ्यायला नको होती, अशी टिष्ट्वटरद्वारे प्रतिक्रिया दिली. भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले की, कायद्याचा मान राखण्यासाठी ज्याने प्रामाणिकपणे कर्तव्यपूर्ती केली त्या पोलिसाच्या कुुटुंबीयांना भेटायला हे गेले नाहीत.
त्यांना सामान्य माणसाशी काही देणेघेणे नाही. त्यावर भाजपाच्या काही लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या भूमिकेकडे भांडारी यांचे लक्ष वेधले असता भाजपाच्या वतीने कुणी अशी भूमिका घेतली असेल तर ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याची सारवासारव केली.