कंटाळा, आंदोलन की व्यायाम?; माणसं पुन्हा चालायला लागली चार पायांवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 09:07 AM2022-12-06T09:07:15+5:302022-12-06T09:07:34+5:30

आधी चार पायांवर चालणारा माणूस आता दोन पायांवर चालायला लागला आहे. दोन पायांवर चालणं हे मानवाचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं.

Boredom, agitation or exercise?; People started walking again on four legs at china | कंटाळा, आंदोलन की व्यायाम?; माणसं पुन्हा चालायला लागली चार पायांवर 

कंटाळा, आंदोलन की व्यायाम?; माणसं पुन्हा चालायला लागली चार पायांवर 

Next

माणूस कधी चालायला लागला? माणसाची उत्क्रांती कशी, केव्हा झाली? असं म्हणतात, की माणूस आधी नरवानर होता. याच नरवानरापासून मानवाची उत्पत्ती झाली आहे. हा नरवानर, आपला पूर्वज आता अस्तित्वात नाही, पण आधुनिक मानवाची उत्क्रांती त्याच्यापासूनच झाली आहे. मानवही आधी चार पायांवर चालायचा. तिथून दोन पायांवर चालण्याच्या मानवाच्या प्रवासाला लाखो वर्षं लागली.  मानवाच्या उत्क्रांतीचा हा कालखंड अतिशय दीर्घ आहे. उत्क्रांतीच्या या प्रक्रियेला तब्बल साठ लाख वर्षांचा कालावधी लागला आहे. 

आधी चार पायांवर चालणारा माणूस आता दोन पायांवर चालायला लागला आहे. दोन पायांवर चालणं हे मानवाचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. यामुळे मानवाचे पुढचे दोन ‘पाय’ म्हणजेच हात इतर कामं करण्यासाठी मोकळे झाले आणि माणूस अधिकच उत्क्रांत होत गेला. एकाच वेळी दोन पाय आणि दोन हातांचा उपयोग मानवाला करता यायला लागल्यामुळे त्याच्या हालचालीत सुलभता तर आलीच, पण त्यामुळेच इतर अनेक कौशल्यंही मानवाला अवगत करता आली, जी इतर प्राण्यांना करता आली नाहीत. त्यामुळेच मानवाचा मेंदूही झपाट्यानं प्रगत होत गेला. दोन पायांवर चालण्याची ही उत्क्रांती मानवामध्ये साधारण ४० लाख वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर मानवाची इतर वैशिष्ट्ये विकसित होत गेली. 

आता मानवाच्या उत्क्रांतीचा हा इतिहास पुन्हा सांगायचं कारण काय? - तर जगात काही ठिकाणी माणसं आता पुन्हा आपल्या उत्क्रांतीपूर्व काळात जाऊ लागली आहेत की काय, अशी शंका वाटावी अशा घटना घडू लागल्या आहेत. काही ठिकाणी माणसं आपलं नेहेमीचं दोन पायांवर चालणं सोडून पुन्हा ‘चार पायांवर’ चालायला लागली आहेत. यातलं प्रमुख ठिकाण म्हणजे चीन ! 

चीनमध्ये सध्या एक नवीनच ट्रेंड आला आहे. विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ! हे कॉलेजवयीन तरुण कॉलेजच्या आवारात, मैदानावर मोठ्या संख्येनं चार पायांवर चालताना, गुडघे टेकून रांगताना दिसून येत आहेत! बिजिंगमधील विद्यापीठांतील अनेक विद्यार्थी असे चार पायांवर रांगत असल्याचं पाहिल्यावर अनेकांना आश्चर्य वाटलं. पण फक्त बिजिंगमध्येच नाही, चीनमध्ये इतरही अनेक ठिकाणी, विशेषत: महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थी असे रांगताना दिसून येत आहेत. चीनमधील ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ त्याचबरोबर इतरही अनेक वृत्तपत्रं आणि माध्यमांनी या घटनेला विस्तृत प्रसिद्धी देतानाच विद्यार्थ्यांच्या या विचित्र वागणुकीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. 
चीनच्या सोशल मीडियावरही तरुणांमधील हा नवा ट्रेंड खूपच व्हायरल होतो आहे. ठिकठिकाणच्या विद्यार्थ्यांचे रांगतानाचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत आणि त्याला तुफान प्रसिद्धीही मिळते आहे. ‘चतुष्पाद’ किंवा ‘चार पायांची चळवळ’ म्हणून या घटनेचं वर्णन केलं जात आहे. 

मांजरी, मगरी, अस्वलं आणि इतर प्राण्यांच्या हालचालींपासून या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असावी आणि या प्राण्यांसारखं आपणही जगून पाहावं अशी स्फूर्ती त्यांनी घेतली असावी असं म्हटलं जात आहे. हजारो विद्यार्थ्यांनी असं अचानक चार पायांवर येण्याचं नक्की कारण तरी काय? केवळ मजा म्हणून, काहीतरी वेगळं करून पाहायचं म्हणून की आणखी काही?.. - त्याबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या या कृतीचं कारण काहीही असलं तरी तज्ज्ञांचं म्हणणं आहे, विद्यार्थ्यांची ही ‘चतुष्पाद’ हालचाल त्यांच्या आरोग्यासाठी मात्र खूपच उपयुक्त आहे. चार पायांवर चालल्यामुळे तुमच्या शरीराचं संतुलन अधिक उत्तम पद्धतीनं होतं. तुमच्या शरीराची हालचाल वाढते. संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. रस्त्यावर रांगत जाणं आणि रांगण्याच्या स्थितीतून पुन्हा सरळ उभं राहण्याच्या स्थितीत येणं, या स्थितीतून पुन्हा रांगण्याच्या स्थितीत जाणं.. या गोष्टी तुम्ही स्वत:च थोडा वेळ करून पाहिल्या तर तुम्हाला किती तरतरी येते, हे तुमचं तुम्हालाच लक्षात येईल, असं आरोग्य अभ्यासकांचं म्हणणं आहे.

कंटाळा, आंदोलन की व्यायाम? 
विद्यार्थी असं का वागताहेत, याबाबत काहींचा अंदाज आहे, चीन सरकारच्या लॉकडाऊनच्या धोरणाला विरोध म्हणून विद्यार्थ्यांचं हे मूक आंदोलन आहे. काहींचं म्हणणं आहे, लॉकडाऊनमुळे सतत घरात राहावं लागलेल्या, बोअर झालेल्या तरुणांनी कंटाळा घालविण्यासाठी योजलेली ही युक्ती आहे, तर अर्थातच काहींचं म्हणणं आहे, आपलं शरीरस्वास्थ्य टिकवण्यासाठी विद्यार्थी करीत असलेला व्यायामाचा हा एक नवा प्रकार आहे ! काहीही असलं तरी चिनी विद्यार्थ्यांच्या या कृतीनं अख्ख्या जगभराचं लक्ष त्यांनी पुन्हा आपल्याकडे खेचून घेतलं आहे हे नक्की !

 

Web Title: Boredom, agitation or exercise?; People started walking again on four legs at china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.