बॉस असावा असा! कर्मचाऱ्यांना दिली महिन्याभराची सुट्टी; 1 दिवसाचाही कापला नाही पगार, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 12:24 PM2023-09-06T12:24:45+5:302023-09-06T12:31:30+5:30
एका बॉसने असंच काहीसं केलं आहे, ज्याची जगभरात सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
एखाद्या ठिकाणी काम करत असताना कंपनीकडून जास्तीत जास्त सुविधा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना काही वेगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात, परंतु काही ठिकाणी असं काही दिलं जातं जे एक खास उदाहरण ठरतं. एका ब्रिटिश बॉसने असंच काहीसं केलं आहे, ज्याची जगभरात सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
एका ब्रिटिश कंपनीच्या सीईओने ऑफिस कल्चरबाबत वेगळं उद्दिष्ट दिलं. आपल्या कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांनी महिनाभर रजेवर पाठवले. ही कोणती शिक्षा नव्हती. किंबहुना या काळात सर्वांना त्यांचा पगार देण्यात आला. आता तुम्हीही विचार करत असाल की असं कसं झालं असेल?
एक महिन्याची पगारी रजा
64 Million Artists असं या कंपनीचं नाव आहे. बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, कंपनीचे सीईओ जो हंटर यांनी हा निर्णय घेतला होता आणि आपल्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याची सुट्टी दिली होती, तीही पूर्ण पगारासह. उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांनी हे केले आणि त्यांचा असा विश्वास आहे की, जर बॉस त्यांच्या कर्मचार्यांशी चांगलं वागला तर ते देखील मनापासून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात.
कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना असा दिलासा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. कोरोना महामारीच्या काळातही कंपनीने कर्मचाऱ्यांना फक्त 4 दिवस काम करण्याची परवानगी दिली होती. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यात सुट्टी दिली कारण त्यांच्या मते यावेळी कमीत कमी काम केले जाते. त्यांचे काम शिक्षण क्षेत्राशी निगडीत असल्याने उन्हाळ्यात काम कमी होते आणि तेव्हाच त्यांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली.