उंटिणींच्या ओठांना बोटॉक्सचं इंजेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 09:30 AM2021-12-27T09:30:01+5:302021-12-27T09:30:33+5:30
उंट हा वाळवंटी भागातील लोकांसाठी संस्कृती आणि परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. या वाळवंटात खनिज तेल सापडलं, देशात पेट्रो डॉलर्सचा ओघ सुरू झाला आणि देशात अचानक अनेक पातळींवर उलथापालथ झाली.
सौंदर्य स्पर्धा हा जगात कायमच चर्चेचा विषय असतो. काही जणांना त्या स्पर्धा, त्यांचे निकष, त्यात जिंकलेले किंवा हरलेले स्पर्धक या सगळ्यात रस असतो, तर काही जण त्यावर टीका करतात; पण सौंदर्य स्पर्धा हा विषय चर्चेला नेहमीच खाद्य पुरवितो. स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या सौंदर्य स्पर्धांची जर इतकी चर्चा असेल, तर सांडणीच्या (उंटाची मादी) सौंदर्य स्पर्धेबद्दल किती उत्सुकता असेल? उंट या तशा बेंगरूळ दिसणाऱ्या प्राण्याची कसली आली सौंदर्य स्पर्धा असं कोणाला वाटूही शकेल. कारण बहुतेक जगाचा उंट या प्राण्याशी कुठलाही सांस्कृतिक किंवा भावनिक बंध नाही.
जगात माणसांना रस असणारे प्राणी म्हणजे कुत्री, मांजरं, गायी, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या आणि पाळीव पक्षी! यापलीकडे असलेल्या पाळीव प्राणी जगताची फारशी कोणी दखल घेत नाही; पण मैलोनमैल पसरलेल्या वाळवंटावर वसलेल्या संयुक्त अरब अमिराती, त्याच्या आजूबाजूचे देश आणि अनेक आफ्रिकन देशांमध्ये मात्र उंट हा फार जिव्हाळ्याचा विषय असतो.
अर्थात आता सगळीकडेच झालेल्या आधुनिकीकरणामुळे उंट हा अरबांच्याही दैनंदिन आयुष्याचा महत्त्वाचा भाग उरलेला नाही; पण त्यांच्यासाठी तो त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेचा भाग आहे आणि म्हणूनच संयुक्त अरब अमिरातीच्या वाळवंटात दरवर्षी सांडणीची सौंदर्य स्पर्धा घेतली जाते. आता ही स्पर्धा सांडणीची का? उंटांच्या का नाहीत? याचं प्रॅक्टिकल उत्तर असं आहे, की या स्पर्धेच्या ठिकाणी देश-विदेशातून उंट प्रजातीचे हजारो प्राणी एकत्र होतात. इतके सगळे नर उंट एकत्र आले की ते भयंकर मारामाऱ्या करतात. त्यामानाने सांडणी शांत असतात. म्हणून केवळ सांडणीची सौंदर्य स्पर्धा घेतली जाते.
यावर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या अल-दाफरा स्पर्धेत विविध देशांतून ४०,००० सांडणींनी सहभाग नोंदविला. इतक्या सगळ्या सांडणींमधून सगळ्यात सुंदर सांडणी निवडण्यासाठीचे निकष पारंपरिक असतात आणि त्या निकषांवर प्रत्येक सांडणीचे बारकाईने निरीक्षण करून निकाल ठरवले जातात. पहिला निकष म्हणजे सांडणीची मान लांब पाहिजे, गाल रुंद पाहिजेत, खूर रुंद पाहिजेत, ओठ लोंबणारे पाहिजेत आणि त्या सांडणीची चाल आकर्षक पाहिजे. देश-विदेशातून ४०,००० सांडणी लोक या ठिकाणी घेऊन आले, कारण त्यासाठीची बक्षिसं मोठी असतात. पहिल्या दहा सांडणींना १३०० ते १३,६०० डॉलर्सचं बक्षीस दिलं जातं.
अल-दाफरा ही तुलनेने छोटी स्पर्धा असते. दुबईच्या मुख्य स्पर्धेतील विजेत्या सांडणीला, म्हणजे तिच्या मालकांना ६६ मिलियन डॉलर्सचं बक्षीस दिलं जातं. या स्पर्धेच्या ठिकाणी लाखो दिरहम किमतीचे उंटाचे सौदे केले जातात. इतक्या मोठ्या रकमा जिथे दिल्या जातात तिथे बक्षीस जिंकण्यासाठी वाट्टेल तशी लबाडी करणारे लोक अर्थातच असतात. मग सांडणीच्या ओठांना बोटॉक्सचं इंजेक्शन देणं, चेहरा रुंद दिसण्यासाठी मसल रिलॅक्सन्ट, वशिंड मोठं करण्यासाठी सिलिकॉन वॅक्स इंजेक्शन आणि काही वेळा तर चक्क प्लास्टिक सर्जरी असे उद्योग केले जातात.
गेल्या काही वर्षांपासून स्पर्धेत एक्स-रे आणि सोनार सिस्टम्स वापरायला लागल्यापासून स्पर्धेत लबाडी करणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी कमी झाली आहे. कुठल्याही प्रकारची प्लास्टिक सर्जरी किंवा हार्मोनल ट्रीटमेंटची परवानगी नसते. कोणी हे करून त्याचा गैरफायदा घेऊन नये यासाठी प्रत्येक सहभागी स्पर्धकाची कसून वैद्यकीय तपासणी केली जाते. यातल्या कुठल्याही स्पर्धेत पकडले गेल्यास त्या उंट ब्रीडरच्या प्रतिष्ठेवर प्रश्चचिन्ह लागतं. शिवाय अशी चोरी पकडणं एकूणच सोपं झाल्यामुळे चिटिंग करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
उंट हा वाळवंटी भागातील लोकांसाठी संस्कृती आणि परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. या वाळवंटात खनिज तेल सापडलं, देशात पेट्रो डॉलर्सचा ओघ सुरू झाला आणि देशात अचानक अनेक पातळींवर उलथापालथ झाली. देशात इन्फ्रास्ट्रक्चरपासून अनेक गोष्टी अतिशय वेगाने बदलल्या. त्याबरोबर मोठी होणारी तरुण पिढी बदलली; पण या बदलाचा वेग इतका जास्त होता, की तो बदल होताना आपली मुळं आपल्या मातीशी जोडलेली ठेवणं बहुतेकांना शक्य झालं नाही आणि मग प्रचंड भौतिक समृद्धी आल्यानंतरही सांस्कृतिक तुटलेपण लोकांना अस्वस्थ करीत राहिलं. आपण खरे कोण आहोत, आपली समाज म्हणून नेमकी ओळख काय, असे प्रश्न दोन पिढ्यांसमोर उभे राहिले. सांडणीच्या सौंदर्य स्पर्धाचं पुनरुज्जीवन करणं हा या पिढ्यांच्या दृष्टीने त्यांना त्यांच्या मातीशी जोडणारा सांस्कृतिक धागा आहे. कारण पैसे नसणं हा प्रश्न सोडविता येतो; पण स्वतःची अशी काही ओळखच नसणं हे फार जास्त भयावह आहे याचं शहाणपण अरबांच्या या पिढीला आलेलं आहे.
पेट्रो डॉलर्स मिळाले, अस्मितेचं काय?
आता श्रीमंत अरबांना रोजच्या आयुष्यात आता उंट लागत नसले तरी आपल्या अनेक पिढ्या केवळ उंटांच्या आधाराने जगल्या हे लक्षात घेऊन उंटाला आयुष्यात शक्य ते स्थान देण्याचा प्रयत्न म्हणजे या सौंदर्य स्पर्धा! पेट्रो डॉलर्सनी आपली सांस्कृतिक ओळख पुसून टाकू नये यासाठीची ही धडपड आहे.