अबब! ७ लाखांना जुनं घर खरेदी केलं अन् ३ कोटींना विकलं; हाती लागला मोठा खजिना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 02:38 PM2022-03-08T14:38:37+5:302022-03-08T14:40:03+5:30
डिसेंबर २०२० मध्ये अलेक्सनं घर खरेदी केले. हे घर ७ हजार ३३१ यूरो म्हणजे ७ लाख ६४ हजार २५५ रुपयांना घेतले
कुणाचं नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. रातोरात काहीजण श्रीमंत झाल्याच्या अनेक घटना समोर येतात. भंगारातील वस्तूही मौल्यवान ठरते. असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे. ज्यानं अलीकडेच एक जुनं घर विकत घेतलं. आता जुनं घरं विकत घेतलं त्याने त्याचा फायदा काय झाला? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हे घर ज्या व्यक्तीनं विकत घेतला त्याला जो खजिना सापडला तो ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
या व्यक्तीनं जे घर विकत घेतलं त्यात अनेक दुर्मिळ वस्तू सापडल्या. रिपोर्टनुसार, Alex Archbold अनोख्या वस्तू खरेदी विक्री करतात. ते ९ वर्षाचे असल्यापासून हे काम करतात. जसजसं वय वाढत गेले तसं अलेक्स या उद्योगात माहीर होत गेला. अलीकडेच त्यांनी एक जुनी प्रॉपर्टी खरेदी केली. परंतु जेव्हा या प्रोपर्टीत त्यांनी आत जाऊन पाहिले तेव्हा त्यांनाच सुखद धक्का बसला. कारण या घरात लपवण्यात आला होता मोठा खजिना.
डिसेंबर २०२० मध्ये अलेक्सनं घर खरेदी केले. हे घर ७ हजार ३३१ यूरो म्हणजे ७ लाख ६४ हजार २५५ रुपयांना घेतले. परंतु ज्या किंमतीला त्यांनी हे घर विकत घेतलं. त्याहून कित्येक पटीने महाग वस्तू या घरात आढळल्या. त्यांनी या घराचा व्हिडीओ यूट्यूबवर पोस्ट केला. ज्या व्यक्तीचं हे घर होतं तो फॅशन डिझानर होता. त्याचं फॅशनवर फार प्रेम होतं. या घरात काही तरी मिळेल असा अंदाज अलेक्सला होता. परंतु हाती लागलेला खजिना पाहून तो अवाक् झाला. या घरातून अलेक्सला अनेक व्हिंटेज सामान सापडलं. त्यात टिफिनी ज्वेलरी, शनेलचे कपडे आणि आणखी मौल्यवान गोष्टी होत्या. जेव्हा या घरातील कपाट पाहिलं तेव्हा त्यात डिझाईनने भरलेले कपडे सापडले. इतकचं नाही तर एक वॉलेट संपूर्ण कॅशनं भरलेले होते.
या जुन्या घरात १०० हून अधिक चांदीच्या सळ्या, सोन्याने भरलेली बॅग आणि हिऱ्याच्या अंगठ्याही सापडल्या. जिथे त्याने हे घर ७,३३१ युरोमध्ये खरेदी केले. त्याने ते २ लाख ९३ हजार २७० यूरो (३, कोटी ०५ लाख ७० हजार २०० रुपये) मध्ये विकले. त्यासाठी त्यांनी तीनदा वेगवेगळ्या वस्तूंचा लिलाव केला. अलेक्स स्वतः म्हणतो की ही त्याच्या आयुष्यातील ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे.