त्यानं १०० नंबरवर फोन केला, भूत पकडायला पोलीस बोलावले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:59 PM2019-07-18T12:59:06+5:302019-07-18T13:00:37+5:30
बहिणीला भूतापासून धोका असल्याचा तरुणाचा दावा
मिर्झापूर: एका तरुणानं चक्क भूत पकडायला पोलिसांना फोन केला. त्यामुळे पोलीसदेखील बुचकळ्यात पडले. बहिणीला भूतापासून धोका आहे. भूत तिच्या जीवावर उठल्यानं तुम्ही भूताला पकडा, अशी विनंती तरुणानं पोलिसांकडे केली. पोलिसांनी तरुणाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काहीही ऐकायला तयार नव्हता. उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये हा प्रकार घडला.
मिर्झापूरच्या कलवारी माफी गावात राहणाऱ्या आनंद नावाच्या तरुणानं १०० नंबरवर फोन केला. त्यानं पोलिसांकडे मदत मागितली. 'तो माझ्या बहिणीचा जीव घेईल. तुम्ही कृपया माझ्या बहिणीला वाचवा,' अशी विनंती आनंदनं फोनवर केली. यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. तरुणाच्या बहिणीला मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला पकडण्याच्या तयारीनं पोलीस दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. मात्र घटनास्थळी पोहोचल्यावर तरुणानं त्याच्या बहिणीला भूताकडून धोका असल्याचा दावा केला. हे ऐकून पोलिसांना धक्काच बसला.
पोलिसांनी या प्रकरणी आनंदचे वडील कृष्ण कुमार यांच्याकडे विचारणा केली. मात्र आनंदनं कशासाठी पोलिसांना बोलावलं, याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं ते म्हणाले. त्यानंतर पोलिसांनी आनंदला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कोणाचंही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. 'माझ्या बहिणीवर एका व्यक्तीनं भूत सोडलं आहे. त्यामुळेच तिच्यावर उपचारांचा परिणाम होत नाही. त्या भूताला पकडल्याशिवाय बहिणीची प्रकृती सुधारणार नाही,' असं आनंदनं पोलिसांना सांगितलं. या घटनेचा पोलिसांनी तयार केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.