हरवला होता मुलगा, घरी पोहोचली मुलगी
By admin | Published: March 16, 2017 10:25 AM2017-03-16T10:25:12+5:302017-03-16T13:42:53+5:30
बेपत्ता झालेला मुलगा घरी मुलगी बनून पोहोचल्याने कुटुंबाला धक्का बसला असून अद्यापही ते या धक्क्यातून सावरलेले नाहीत
Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि 16 - गुजरातमधील अहमदाबादमध्ये राहणा-या प्रतिष्ठीत ज्वेलर्स कुटुंबाचा फोन वाजला तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांच्या हरवलेल्या मुलाचा पत्ता लागल्याने त्यांना दिलासा मिळाला होता. श्याम (बदललेलं नाव) गेल्या आठवड्यात बेपत्ता झाला होता. कुटुंबाच्या मालकीच्या सोन्याच्या दुकानातून घरी येत असताना श्याम अचनाक बेपत्ता झाला होता. कुटुंबाला आशा होती त्याप्रमाणे पोलिसांचा तो फोन होता. त्यांनी तुमच्या मुलाचा शोध लागल्याचं सांगितलं. सोबतच पोलिसांनी हेदेखील सांगितलं की तुमचा मुलगा श्याम आता मुलगा राहिला नसून मुलगी झाला आहे.
सेक्स चेंज सर्जरी करायची असल्यानेच श्याम जाणुनबुजून घरातून बेपत्ता झाला होता. ही गोष्ट माहिती पडल्यापासून श्यामचे आई-वडिल आणि लहान बहिण अजूनही धक्क्यातून सावरलेले नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 'श्यामने ग्रॅज्युएशन पुर्ण केल्यानंतर कुटुंबाचा व्यवसाय पुढे सुरु ठेवण्याचं ठरवलं होतं. काही वर्षांपुर्वी आपण एक मुलगी असल्याची जाणीव त्याला होऊ लागली होती. सेक्स चेंज ऑपरेशन करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी श्मयाने कुटुंबाला मनवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी परवानगी दिली नाही. त्या दिवसानंतर त्याने पुन्हा कधीच हा उल्लेख घरी केला नव्हता'.
कुटुंबियांना सर्व काही ठीक झालं आहे असं वाटत असतानाच श्याम गेल्या आठवड्यात बेपत्ता झाला. माधपुरामधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के एन मनत यांनी सांगितलं की, 'कुटुंबाने श्याम बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. आम्ही फोन ट्रॅक केला असता नवरंगपुरा लोकेशन असल्याचं कळलं. पोलिसांना एका रुग्णालयाबाहेर श्यामची मोटारसायकल असल्याचं दिसलं. श्याम त्या रुग्णालयात सेक्स चेंज ऑपरेशन करण्यासाठी गेला होता. हे सर्व आपल्या मर्जीने करत असल्याचं त्याने सांगितलं आहे. आम्ही कुटुंबाला यासंबंधी माहिती दिली असून केस बंद केली आहे'.
श्याम गेल्या अनेक दिवसांपासून या ऑपरेशनची तयारी करत होता. ऑपरेशनच्या दीड वर्ष आधी त्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी घेतली होती. बातमी कळताच कुटुंबीय श्यामला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले मात्र त्याने भेटण्यासाठी नकार दिला. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण श्यामने भेट घेतली नाही.