लव्ह इज इन द एअर! चक्क विमानात फिल्मी स्टाईल प्रपोज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 01:26 PM2018-05-22T13:26:19+5:302018-05-22T13:28:18+5:30
आयुष्यरुपी प्रवासाच्या नवा टप्प्याला विमानातून सुरुवात
इंदूर: गुडघ्यावर बसून 'माझी होशील का?', असं चारचौघांमध्ये केलेलं प्रपोज म्हणजे बॉलिवूडमधील चित्रपटांचं वैशिष्ट्य. चित्रपटानंतर असे प्रपोज अनेकांनी त्यांच्या आयुष्यात केले. मात्र कितीही धीर एकवटला तरी, चारचौघात ती नाही म्हणाली, तर काय?, ही भीती मनात असतेच. मात्र इंदूरहून गोव्याला जाणाऱ्या विमानात एका प्रेमवीरानं चक्क गुडघ्यावर बसून प्रवासी आणि विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांसमोर त्याच्या मैत्रिणीला प्रपोज केलं. समोरच्या मुलीनं होकार दिल्यानं त्याची ही सर्व मेहनत कामी केली.
इंदूरहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात रविवारी नरेंद्र अनानदानी नावाचा तरुण चढला. नरेंद्रची मैत्रीण गोव्याला जात होती. तिच्यासाठी तो खास नागपूरहून इंदूरला आला होता. मैत्रीण सीटजवळ पोहोचताच विमानातील स्पीकरवर तिला नरेंद्रचा आवाज ऐकू आला. नरेंद्रचा आवाज ऐकताच तरुणी ज्या ठिकाणाहून घोषणा केली जाते, त्या दिशेनं चालू लागली. तितक्यात तिला नरेंद्र दिसला. यानंतर नरेंद्रनं त्याच्या मैत्रिणीला सर्व प्रवाशांसमोर गुडघ्यावरुन बसून प्रपोज केलं. यावेळी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही त्याला साथ दिली. 'विल यू मॅरी मी?' असे फलक हाती धरुन कर्मचारी उभे राहिले. नरेंद्रनं प्रपोज करण्यासाठी घेतलेले हे कष्ट पाहून मैत्रिणीलाही आनंद झाला. तिनं लगेच होकार दिला आणि ही 'लव्ह इज इन द एअर' प्रकारातील घटना पाहणाऱ्या प्रवाशांनी दोघांचंही अभिनंदन केलं.
'प्रवास करणाऱ्या मुलीला नरेंद्र तिकडे येणार असल्याची कोणतीही कल्पना नव्हती. तिनं नेहमीप्रमाणे विमानात प्रवेश केला,' अशी माहिती इंदूर विमानतळाच्या संचालिका आर्यमा संन्याल यांनी दिली. या फिल्मी स्टाईल स्टाईल प्रपोजसाठी नरेंद्रनं मोठी तयारी केली होती. यासाठी त्यानं विमानातील कर्मचाऱ्यांना विनंती केली होती. अखेर नरेंद्रनं घेतलेले सर्व कष्ट कामी आले अन् विमानातून त्याच्या आयुष्यरुपी प्रवासाचा नवा टप्पा सुरू झाला.