ऐकावं ते नवंलंच! मुलाचे नाव ठेवले 'ABCDEFGHIJK', नाव पाहून अधिकारीही झाले चकित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 01:16 PM2021-10-28T13:16:43+5:302021-10-28T14:00:11+5:30
सुमात्रामधील एका व्यक्तीने आपल्या मुलाचे असे विचित्र नाव का ठेवले ? जाणून घ्या कारण...
कोणत्याही व्यक्तीला जन्मावेळी दिलेले नाव ही त्याची ओळख असते. त्यामुळेच नाव अतिशय विचारपूर्वक ठेवले जाते. बहुतेक मुलांचे पालकच त्यांची नावे ठेवतात, पण काही विशेष प्रकरणांमध्ये जवळचे नातेवाईक नाव ठेवतात. प्रत्येकजण आपल्या मुलांचे काही अर्थपूर्ण नाव ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण सुमात्रामध्ये एका मुलाच्या वडिलांनी ठेवलेले त्याचे नाव सध्या चर्चेचा विषय बनला आहे. एका व्यक्तीने आपल्या मुलाचे नाव इंग्रजी वर्णमालेतील पहिली 11 अक्षरे म्हणजेच 'ABCDEFGHIJK' असे ठेवले आहे.
स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, नुकतंच एक मूल सुमात्रा येथील एका क्लिनिकमध्ये कोरोनाची लस घेण्यासाठी आलं होतं. या 12 वर्षाच्या मुलाचे ओळखपत्र पाहून आरोग्य अधिकारीही आश्चर्यचकित झाले. मुलाचे नाव पाहून त्याला वाटले की, कदाचित आपली चेष्टा केली जात आहे. ओळखपत्रावर मुलाचे नाव 'ABCD EFGH IJK Zuzu' असे लिहिले होते.
यानंतर त्यांनी तात्काळ मुलाच्या पालकांना फोन केला. मुलाचे नाव ABCD EFGH IJK असल्याचे जेव्हा त्यांना समजले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. मुलाचे वडील जुल्फाही झुझू यांनी सांगितले की, त्यांनीच हे नाव ठेवले आहे. आपल्या मुलाने मोठे होऊन लेखक व्हावे अशी त्यांची नेहमीच इच्छा होती. यामुळे त्यांनी मुलाचे असे नाव ठेवले. मात्र, घरातील लोक प्रेमाने मुलाला अडेफ म्हणतात.
इंडोनेशियन न्यूज साइट डेटेकनुसार, मुलाच्या जन्माच्या 6 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनी त्याच्या नावाचा विचार केला होता. खरं तर जुल्फहीला स्वतः लेखक व्हायचे होते, पण त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही म्हणून त्यांनी मुलाच्या माध्यमातून ते पूर्ण करण्याचा विचार केला. यामुळेच त्यांन आपल्या मुलाचे नाव ABCD EFGH IJK ठेवले. विशेष म्हणजे, त्यांना आपल्या इतर दोन मुलांची नावे NOPQRSTUV आणि XYZ ठेवायची होती. पण काही कारणास्तव त्यांची नावे अम्मार आणि अत्तूर ठेवण्यात आली.