मेंदूत सळी जाऊनही जीव वाचला !
By admin | Published: February 20, 2016 02:23 AM2016-02-20T02:23:30+5:302016-02-20T02:23:30+5:30
बांधकामाच्या साइटवर काम करणाऱ्या एका कामगाराच्या डोक्यात चौथ्या मजल्यावरून पडलेली लोखंडी सळी घुसली. पण सायन रुग्णालयातील न्यूरो विभाग डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे या तरुणाचे प्राण वाचले आहेत.
मुंबई: बांधकामाच्या साइटवर काम करणाऱ्या एका कामगाराच्या डोक्यात चौथ्या मजल्यावरून पडलेली लोखंडी सळी घुसली. पण सायन रुग्णालयातील न्यूरो विभाग डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे या तरुणाचे प्राण वाचले आहेत.
मालाडमधील बांधकाम साइटवर मोहम्मद गुड्डू (२४) हा कामगार तळ मजवल्यावर काम करीत होता. त्यावेळी अचानक एक लोखंडी सळी बांधकामाच्या साइटवरील चौथ्या मजल्यावरून खाली पडली आणि त्याच्या डोक्याच्या मागच्या भागात घुसली. तत्काळ त्याला नजीकच्या संजीवनी रुग्णालयात नेण्यात आले. तिथून त्याला सायन रुग्णालयात हलविण्यात आले.
मोहम्मदवर सायन रुग्णालयातील न्यूरो सर्जरी विभागाचे डॉ. बटुक दियोरा यांच्या टीमने शस्त्रक्रिया केली. मोहम्मदच्या डोक्यात घुसलेली सळी मेंदूच्या ज्ञानेंद्रियाच्या आत गेली नव्हती. मेंदूत ज्या भागात सळी घुसलेली तो भाग शारीरिक कार्यात अडथळा आणणारा नव्हता. पण त्याच्या शरीराच्या उजव्या भागाला अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यामुळे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)