अनोखी प्रथा! इथे लग्नानंतर कपल ३ दिवस टॉयलेटलाच जात नाहीत, कारण वाचून चक्रावून जाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 10:35 AM2020-02-20T10:35:09+5:302020-02-20T10:49:24+5:30
तीन दिवस नवीन जोडप्याला टॉयलेटला जाऊ दिलं जात नाही आणि त्यासाठी लोकांमध्ये अनेक मान्यता आहे.
जगभरात लग्नाबाबत वेगवेगळे रितीरिवाज पार पाडले जातात. भारतात तर शहरं बदलली की लग्नाच्या परंपरा बदलतात. अशीच एक आश्चर्यचकित करणारी परंपरा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. इंडोनेशियातील टीडॉन्ग समुदायात हा अनोखा आणि विचित्र रिवाज केला जातो. इथे नवरी आणि नवरदेव लग्नानंतर तीन दिवसांपर्यंत टॉयलेटचा वापरच करत नाहीत.
लग्नानंतर नवरी आणि नवरदेवाने टॉयलेटचा वापर करणं इथे अपशकुन मानला जातो. येथील लोक या रिवाजाला एक पवित्र रिवाज मानतात. टॉयलेटला गेल्यावर या रिवाजाची पवित्रता दूर होते. तसेच असं केलं तर नवरी-नवरदेव अशुद्ध होतात. येथील लोकांमध्ये मान्यता आहे की, नवरी-नवरदेवाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी इंडोनेशियामध्ये हा रिवाज केला जातो.
या समुदायानुसार, वॉशरूम अनेक लोक वापरतात. लोक शरीरातील घाण बाहेर काढतात. त्यामुळे तिथे नकारात्मक शक्ती असतात. लग्नानंतर लगेच टॉयलेटला गेल्याने हीच नकारात्मकता नवरी-नवरदेवात येण्याचा धोका असतो. इतकेच नाही तर नव्या जोडप्याचं नातंही धोक्यात येऊ शकतं, अशी मान्यता आहे.
अनेकदा तर नातं तुटण्याचीही वेळ येते. त्यामुळे या समुदायातील लोक या मान्यतेबाबत फार जागरूक आहेत. इतकेच नाही तर त्यांच्यात अशीही मान्यता आहे की, हा रिवाज तोडला तर जोडप्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे ते पूर्ण काळजी घेतात की, नवरी-नवरदेवाला या रिवाजामुळे कोणतीही अडचण होऊ नये. तसेच त्यांनी शौचालयाचा वापर करू नये. त्यासाठी त्यांना कमी खायला आणि प्यायला दिलं जातं.