इथे बहीण बनते 'नवरदेव', वहिनीसोबत करते लग्न; नवरदेव असतो घरी...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 11:40 AM2023-12-06T11:40:36+5:302023-12-06T11:41:02+5:30
Weird Marriage Tradition : गुजरातच्या काही गावांमध्ये नवरदेवाशिवायच लग्न होतं. म्हणजे लग्नावेळी नवरदेव उपस्थित नसतो.
Weird Marriage Tradition : भारत हा देश आपल्या वेगवेगळ्या परंपरा आणि संस्कृतींसाठी ओळखला जातो. इथे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे रिवाज आणि मान्यता बघायला मिळतात. लग्नाबाबत तर अनेक अनोख्या परंपरा फार आधीपासून चालत आल्या आहेत. लग्नाच्या एका अशाच अनोख्या रिवाजाबाबत आम्ही आज सांगणार आहोत. गुजरातच्या काही गावांमध्ये नवरदेवाशिवायच लग्न होतं. म्हणजे लग्नावेळी नवरदेव उपस्थित नसतो. त्याऐवजी नवरदेवाची बहीण वहिनीसोबत लग्न करते आणि आपल्या भावासाठी पत्नी आणते.
एका वेबसाइटनुसार, गुजरातच्या सुरखेड़ा, सनादा आणि अंबाल गावांतील आदिवासी जमातीमध्ये लग्नासंबंधी अनोखी परंपरा पाळली जाते. या गावातील लग्नांमध्ये नवरदेव उपस्थित असण्याची गरज नसते. त्याऐवजी नवरदेवाची अविवाहित बहीण किंवा परिवारातील कुणीही अविवाहित महिला हे लग्न करू शकते.
मान्यतेचं कारण
अर्थातच तुम्हाला या मान्यतेचं कारण काय? असा प्रश्न पडला असेल. असं म्हणतात की, या तिन्ही गावाचे जे कुलदेवता होते ते अविवाहित होते. त्यांना सन्मान देण्यासाठी लग्नावेळी नवरदेवाला त्याच्या घरीच ठेवलं जातं. जेणेकरून कुलदेवताचा श्राप नवरदेवाला लागू नये. नवरदेव लग्नाचे कपडे घालून तयार होतो. फेटा बांधतो आणि पारंपारिक तलवारही घेतो, पण तो त्याच्या लग्नात जात नाही.
सगळे रितीरिवाज पार पाडते बहीण
एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, गावातील एका व्यक्तीने याबाबत सांगितलं की, नवरदेव आपल्या आईसोबत घरीच राहतो आणि नवरदेवाची बहीण वरात घेऊन जाते. लग्न करून बहीण नवरीला घरी आणते. जे रितीरिवाज नवरदेवाला पार पाडायचे असतात ते सगळे लग्नातील रितीरिवाज त्याची बहीण पार पाडते. मग ते सप्तपदी असो वा मंगळसूत्र घालून देणं असो.
गावात मानलं जातं की, जर कुणी या परंपरेचं पालन केलं नाही तर त्यांच्यासोबत काहीतरी वाईट होईल. लोकांची मान्यता आहे की, एकदा ही परंपरा पाळली गेली नव्हती तेव्हा त्यांचं लग्न लवकरच मोडलं होतं. काही लोकांच्या जीवनात वेगवेगळ्या समस्या आल्या होत्या.