माझा नवरा, तुझी बायको! बत्ती गुल अन् बदलल्या वधू; दोन बहिणांच्या लग्नात अजब गोंंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 03:28 PM2022-05-09T15:28:24+5:302022-05-09T15:31:43+5:30
लोडशेडिंगचे असेही साईड इफेक्ट्स! विधी पूर्ण झाल्यावर समजलं भलत्याशीच लग्न लागलं
उज्जैन: लग्नसोहळा सुरू असताना वीज पुरवठा खंडित झाल्यानं एक अजब घटना घडली. लग्न सुरू असताना अंधार झाल्यानं वधू वरांची अदलाबदल झाली. जेव्हा वीज पुरवठा सुरळात झाला, त्यावेळी आपल्या समोर असलेली व्यक्ती पाहून चौघांनाही धक्का बसला. त्यानंतर सप्तपदीवेळी ही चूक सुधारण्यात आली.
जिल्ह्याच्या इंगोरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. रमेशलाल यांच्या तीन मुली आणि एका मुलाचा विवाह होता. त्यापैकी दोन मुली, निकिता आणि करिश्मा यांचा विवाह दंतेवाड्यातील भोला आणि गणेश यांच्याशी झाला. दोन तरुण वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत. वरात आल्यानंतर रात्री ११.३० वाजता माता पूजनाचा विधी झाला. दोन नवरदेवांनी वेगवेगळ्या वधूंचा हात धरून पूजा केली.
निकिताचा विवाह भोलाशी आणि करिश्माचं लग्न गणेश सोबत ठरलं होतं. पूजा सुरू होण्याच्या आधी वीज पुरवठा खंडित झाला. रात्री १२.३० च्या सुमारास वीज आली. त्यावेळी निकिताच्या हातात गणेशचा आणि करिश्माच्या हातात भोलाचा हात होता. हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. पहाटे ५ वाजता दाम्पत्यांनी सप्तपदी घेतली. त्यावेळी ही चूक सुधारण्यात आली.
गावात विजेची समस्या असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. गावात दररोज वीज जाते. कित्येक तास वीज पुरवठा खंडित असतो. त्याचमुळे विवाह सोहळ्यात वधू-वराची अदलाबदल झाल्याचं गावकरी म्हणाले.