काय सांगता? हाऊसकिपरला मिळणार तब्बल 18.5 लाख पगार; पण एका अटीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 10:57 AM2020-10-29T10:57:45+5:302020-10-29T11:05:29+5:30
British Royal Family Housekeeper : एका ब्रिटिश रॉयल फॅमिलीला उत्कृष्ट असा हाऊसकिपर हवा आहे. या कामासाठी हाऊसकिपरला तब्बल 18.5 लाख रुपये पगार देण्यात येणार आहे.
हाऊसकिपर पाहिजे अशा अनेक जाहिराती या आपण नेहमीच पाहत असतो. मात्र या कामासाठी लाखो रुपये पगार मिळेल असं जर कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही, पण हो हे खरं आहे. हाऊसकिपरला देण्यात येणाऱ्या पगाराची रक्कम ऐकून सर्वच जण हैराण झाल आहेत. एका ब्रिटिश रॉयल फॅमिलीला उत्कृष्ट असा हाऊसकिपर हवा आहे. या कामासाठी हाऊसकिपरला तब्बल 18.5 लाख रुपये पगार देण्यात येणार आहे. रॉयल फॅमिलीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर याची जाहिरात दिली आहे.
वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, Level 2 Apprenticeship ची ही नोकरी आहे. त्यामुळे या नोकरीसाठी ज्या उमेदवाराची निवड होईल तो Windsor Castle मध्ये राहणार आहे. हाऊसकिपरला आठवड्याचे पाच दिवस काम आणि दोन दिवस सुट्टी असेल. तसेच वर्षभरात 33 सुट्ट्या मिळतील. याशिवाय राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्थाही पॅलेसमार्फतच केली जाणार आहे. तसेच नोकरी करताना प्रवास असल्यास त्याचा खर्चही वेगळा दिला जाईल.
जवळपास 18.5 लाख असणार पगार
हाऊसकिपरची सुरुवातीची सॅलरी ही 19140 ब्रिटिश पाऊंड म्हणजेच जवळपास 18.5 लाख असणार आहे. त्याला बकिंघम पॅलेससह (Buckingham Palace) रॉयल फॅमिलीच्या अन्य पॅलेसमध्ये काम करावं लागेल. उमेदवाराला वर्षभर रॉयल्सच्या वेगवेगळ्या पॅलेसमध्ये पाठवलं जाईल. हाऊसकिपरला मोठा पगार देण्यात येणार आहे मात्र त्यासाठी एक अट आहे. उमेदवाराला इंग्रजी आणि गणित यायला हवं, ही अट आहे. वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही हाऊसकिपिंगच्या टीममध्ये सहभागी असेल.
नोकरीसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार
हाऊसकिपरला काम करताना पॅलेसच्या आतील स्वच्छता आणि वस्तूंची योग्यरित्या देखभाल करावी लागणार आहे. उमेदवाराला नोकरीसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी 13 महिने असेल. 13 महिन्यांचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्या उमेदवाराला शाही परिवारातील एक स्थायी कर्मचारी म्हणून कामावर ठेवलं जाईल. अनेक ठिकाणी हाऊसकिपरची गरज असते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.