एका तासात बांधा आपल्या स्वप्नातलं घर; ८० लाख खर्च, काय काय आहे या घरात? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 11:36 AM2022-09-12T11:36:00+5:302022-09-12T11:36:32+5:30

मुळात आपल्या मनासारखं घर आपल्याला मिळणारच नाही किंवा आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट आपल्या घरात असावी,

Build your dream home in an hour; 80 lakh cost, what is in this house? | एका तासात बांधा आपल्या स्वप्नातलं घर; ८० लाख खर्च, काय काय आहे या घरात? 

एका तासात बांधा आपल्या स्वप्नातलं घर; ८० लाख खर्च, काय काय आहे या घरात? 

googlenewsNext

तुम्हाला एखादं मनासारखं घर बांधायचं असेल, तुमच्या मनासारख्या सगळ्या सोयी त्यात हव्या असतील तर त्यासाठी किती दिवस, महिने, वर्ष लागतील? मुळात घर घेण्याची किंवा घर बांधण्याची संकल्पनाच खूप मोठी आणि क्लिष्ट आहे. अनेक टप्प्यांवर अनेक  गोष्टी त्यात अंतर्भूत असतात. त्यामुळे आपल्या कल्पनेतलं घर प्रत्यक्षात उभं राहणं ही खरंतर खूप कठीण गोष्ट आहे, पण हीच गोष्ट आता इतकी सहज आणि सोपी झाली आहे की, तुम्ही कधी स्वप्नातही या गोष्टीची कल्पनादेखील केली नसेल.

मुळात आपल्या मनासारखं घर आपल्याला मिळणारच नाही किंवा आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट आपल्या घरात असावी, यासाठीचा अट्टाहासच जर तुम्ही धरला तर त्यासाठी किमान वर्ष-सहा महिने तरी लागतीलच. पण आता अशी घरं तयार झाली आहेत, होताहेत, की  ठरवलं तर अगदी तासाभरात तुम्ही आपल्या आवडीच्या या घरात राहायला जाऊ शकाल. आश्चर्य वाटलं ना? - पण हे आता प्रत्यक्षात आलंय. एका बॉक्समध्ये भरलेलं आणि इकडून-तिकडे सहजपणे नेता येणारं तुमचं हे घर अगदी तासाभरात ‘बांधून’ तयार होऊ शकतं.

अमेरिकेतील लास वेगास येथील ‘बॉक्सेबल’ या कंपनीनं हे स्वप्न प्रत्यक्षात आणलं आहे. या ‘रेडिमेड’ घरांना ‘कॅसिटा’ असं नाव देण्यात आलं आहे. अमेरिकेतल्या महागाईवर शोधलेला प्रचंड किफायतशीर असा हा पर्याय आहे. शिवाय या घरांमध्ये असलेली विविधता आणि त्यातलं सौंदर्य कोणालाही आकर्षित करेल असंच आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत सर्वात वर असलेले, तब्बल २५१ अब्ज डॉलर्स इतकी महाप्रचंड संपत्ती असलेले ॲलन मस्कदेखील याच ‘रेडिमेड’ घरात राहतात हे सांगितलं, तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

अमेरिकेतील महागाई सध्या अक्षरश: गगनाला भिडली आहे. सर्वच वस्तूंचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य अमेरिकन माणूस अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. या महागाईला कंटाळून अनेक अमेरिकन नागरिकांनी तर आपल्या देशातूनच स्थलांतर करताना शेजारच्या मेक्सिकोमध्ये आश्रय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अमेरिकेतील घरांचे दर तब्बल तीस टक्क्यांपेक्षाही जास्त वाढले आहेत. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत जी घरं साधारण ३ लाख २९ हजार डॉलर्सना (सुमारे २.६२ कोटी रुपये) मिळत होती, त्याच घरांची किंमत आज तब्बल ४ लाख  २८ हजार ७०० डॉलर्स (सुमारे ३.४२ कोटी रुपये) इतकी झाली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य अमेरिकन माणसांना ‘बॉक्सेबल’सारख्या स्टार्टअपचा खूप मोठा आधार मिळाला आहे. अनेकजण अशा रेडिमेड घरांकडे आता वळताहेत. 

‘बॉक्सेबल’नं जी घरं तयार केली आहेत, त्यांची किंमत साधारण ५४,५०० ते ९९,५०० डॉलर्स (४३.५२ ते ८० लाख रुपये) इतकी आहे. अमेरिकेतील महागाईच्या तुलनेत इतकी स्वस्त घरं म्हणजे त्यांना पर्वणीच वाटते आहे. अशा प्रकारची स्वस्तातली, तरीही टिकाऊ आणि देखणी घरं बनवायचं स्वप्न पाओलो तिरामाणी यांनी पाहिलं होतं. या स्वप्नाचा त्यांनी केवळ ध्यासच घेतला नाही, तर ते प्रत्यक्षात साकार करताना २०१७मध्ये त्यांनी ‘बॉक्सेबल’ या कंपनीची स्थापना केली. त्यानंतर अल्पावधीतच त्यांनी आपल्या या स्वप्नाला आकार दिला आणि सर्वसामान्य अमेरिकन माणसालाही परवडतील अशी घरं विकसित केली. या कंपनीचे ते सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. अमेरिकन लोकांच्या स्वप्नातलं हे घर केवळ एक मिनिटात उभारलं जाईल, ही त्यांची मनिषा होती. एक मिनिटात जरी नाही, तरी आपल्या घर उभारणीचा वेळ त्यांनी एक तासापर्यंत खाली आणला आहे. अर्थात एक मिनिटात घर उभारणीचं त्यांचं स्वप्न त्यांनी अजूनही सोडलेलं नाही. 

पाओलो यांचं म्हणणं आहे, हा सगळा आधुनिक तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे. याच तंत्रज्ञानाच्या मदतीनं जी गोष्ट पूर्वी कल्पनेच्याही पलीकडे होती, ती आम्ही प्रत्यक्षात आणली आहे. या घरांमध्ये इन्सुलिन टेक्नॉलॉजी आणि एलईडी लायटिंगचाही खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे विजेच्या बिलातही प्रचंड मोठ्या प्रमाणात कपात होईल. आगामी काळात ही घरं सर्वसामान्यांसाठी खरोखरच देवदूत बनून त्यांच्या पाठीशी उभी राहतील...

काय काय आहे या घरात? 
या घरात प्रत्येकासाठी फूल साइज किचन आहे. त्यात फ्रीज, सिंक, ओव्हन, डिशवॉशर, मायक्रोवेव्ह इतकंच नाही तर कॅबिनेट्सचीही व्यवस्था आहे. बाथरुममध्ये सिंक, मोठं काऊंटर, आरसे आणि स्लायडिंग ग्लासची सोय करण्यात आली आहे. लिव्हिंग रुम ३७५ चौरस फुटांची असून, त्याला आठ दरवाजे आणि खिडक्या आहेत. फ्लोअरिंग लाकडाची आहे. एसीसाठीही त्यात जागा आहे.

Web Title: Build your dream home in an hour; 80 lakh cost, what is in this house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.