कांदे-बटाटे नाही तर इथे भरतो नवरींचा बाजार, पैसे देऊन पुरूष खरेदी करतात पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 03:53 PM2023-11-01T15:53:33+5:302023-11-01T15:54:04+5:30
आज आम्ही तुम्हाला एका अशा देशाबाबत सांगणार आहोत जिथे नवरींचा बाजार भरवला जातो.
वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या समुदायांचे लोक राहतात. त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती आणि वेगवेगळ्या प्रथा असतात. ज्या ते अनेक वर्षांपासून पाळत असतात. लग्नाबाबत तर जगभरात अनेक प्रथा आहेत. आज आम्ही तुम्हाला एका अशा देशाबाबत सांगणार आहोत जिथे नवरींचा बाजार भरवला जातो.
इथे लग्नासाठी बाजारात मुलींवर बोली लावली जाते. इतकंच नाही तर मुलींचे आई-वडिलच त्यांना बाजारात घेऊन जातात. या बाजारात नवरींची खरेदी करणारे अनेक लोक येतात. जे सर्वात सर्वात जास्त बोली लावतात, आई-वडील आपल्या मुलीचं लग्न त्याच्यासोबत ठरवतात.
बुल्गेरियाच्या स्तारा जागोर नावाच्या ठिकाणावर वर्षातून चार वेळा असा बाजार भरतो. इथे येणारे लग्नाळू मुले आपल्या आवडीच्या मुलीवर बोली लावून त्या मुलीला आपली पत्नी बनवू शकतात. एका रिपोर्टनुसार, या मुलींचं वय 13 ते 20 वर्षे असतं.
नवरींचा बाजार कलाइदझी समाजाकडून भरवला जातो आणि इथे बाहेरील व्यक्ती येऊन नवरी खरेदी करू शकत नाही. एका रिपोर्टनुसार, या समाजात सध्या साधारण 20 हजार लोक आहेत.
असं म्हटलं जातं की, या समुदायातील मुलींनाही या परंपरेवरून खास काही आक्षेप नाही. कारण त्यांना सुरूवातीपासूनच यासाठी मानसिक रूपाने तयार केलं जातं. या समुदायातील लोक आपल्या मुलींना 13-14 वयानंतर शाळेतून काढतात.
इथे जेव्हा एखाद्या मुलाला मुलगी पसंत पडते त्यानंतर खरेदीची रक्कम ठरवली जाते. एका रिपोर्टनुसार या बाजारात मुलींवर 300 ते 400 डॉलर इतकी बोली लागते.
नवरीच्या बाजारात पोहोचण्यासाठी मुली अनेक दिवसांपासून तयारी सुरू करतात. जास्त पैसे मिळण्यासाठी त्यांचं सुंदर दिसणंही महत्वाचं असतं. त्यामुळे त्या चांगले कपडे आणि मेकअपसोबत बाजारात येतात.
बाजारात मुलगी पसंत आल्यवर मुलगा तिला आपली पत्नी मानतो. त्यानंतर दोघांचे आई-वडील लग्नासाठी तयार होणं गरजेचं असतं. दोन्हीकडील लोकांमध्ये बोलणी होते. त्यानंतर रक्कम ठरते आणि मग नातं ठरतं.