माजी सैनिकच्या गळ्यात 77 वर्षांपासून अडकली बंदुकीची गोळी; X-ray पाहून डॉक्टरही चकीत...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 02:53 PM2022-11-10T14:53:26+5:302022-11-10T14:54:42+5:30
गोळी गळ्यात अडकल्याची माहिती या 95 वर्षीय माजी सैनिकालाही नव्हती.
युद्धामध्ये सैनिकांना गोळ्या लागतात, या गोळ्या काढूनही अनेकदा त्यांचा मृत्यू होतो. पण, एक व्यक्ती आयुष्यभर एक गोळी शरीरात घेऊन फिरतो. 95 वर्षीय व्यक्ती उपचारासाठी रुग्णालयात गेला, यावेळी डॉक्टरांनी एक्स-रे काढताच त्यांना धक्का बसला. त्याच्या घशात गोळी अडकल्याचे एक्सरेमधून समोर आले.
77 वर्षांपासून गोळी शरीरात
95 वर्षीय झाओ हे चीनचे रहिवासी असून, निवृत्त लष्करी जवान आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या 77 वर्षांपासून ही गोळी त्यांच्या गळ्यात अडकली आहे. पण हे त्यांना कधीच कळले नाही. अलीकडेच झाओ शानडोंग प्रांतातील रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या गळ्याचे एक्स-रे काढला. यावेळी पहिल्यांदाच त्यांना गळ्यात गोळी अडकल्याचे आढळून आले. ही गोळी त्यांना दुसऱ्या महायुद्धात लागली होती.
आजही शरीरावर युद्धाच्या कुणा
झाओचा जावई वांग यांनी सांगितले की, ही गोळी त्यांच्या मानेवर कधी झाडली गेली, हे त्यांना माहित नाही. मात्र, युद्धादरम्यान त्यांना अनेकवेळा गोळ्या लागल्या आहेत. झाओच्या शरीरावर आजही अनेक युद्धाच्या खुणा दिसतात. एकदा युद्धादरम्यान, झाओ स्वतः जखमी कॉम्रेडला नदीच्या पलीकडे घेऊन जात असताना जखमी झाले होते. त्यांच्या शरीरावर आजही गोळ्यांच्या खुणा दिसून येतात.
गोळी काढली जाणार नाही
याप्रकरणी डॉक्टर म्हणतात की, 77 वर्षांपासून गोळी अडकली असूनही, झाओ यांना काही जाणवलं नाही, हे आश्चर्याची बाब आहे. दरम्यान, ही गोळी काढली जाणार नाही. यामागे झाओचे वय हे कारण सांगण्यात येत आहे. घशाचे ऑपरेशन करून गोळी काढताना त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. याबाबत झाओ म्हणतात- 'मी इतक्या वर्षांपासून निरोगी आहे, त्यामुळे आता मला काही फरकत पडत नाही.'