इथे मिळताहेत केवळ ८० रूपयात घरे, गावाचा विकास हाच ध्यास!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 12:40 PM2019-10-03T12:40:54+5:302019-10-03T13:18:51+5:30

वेगवेगळ्या सिनेमांमधून तुम्ही हे ठिकाण पाहिलं असेलच. इथे जाऊन राहणं म्हणजे एकप्रकारे स्वप्नासारखंच.

Buy a house in this Italian village for just Rs 80 | इथे मिळताहेत केवळ ८० रूपयात घरे, गावाचा विकास हाच ध्यास!

इथे मिळताहेत केवळ ८० रूपयात घरे, गावाचा विकास हाच ध्यास!

Next

(Image Credit : cnbc.com)

इटली हे वेगवेगळ्या सिनेमांमधून तुम्ही पाहिलं असेलच. इथे जाऊन राहणं म्हणजे एकप्रकारे स्वप्नासारखंच. पण आता तुम्हाला इटलीमध्ये स्वत:च्या घरात राहण्याची संधी चालून आली आहे. इटलीतील बेट सिसिलीच्या एका नगर परिषदेने परदेशी लोकांना तिथे घर घेण्यासाठी एक योजना जाहीर केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या गावात स्थायिक होण्यासाठी आणि इथे घर घेण्यासाठी तुम्हाला केवळ ८० रूपये एवढाच खर्च करावा लागणार आहे. सिसिलीच्या ग्रामीण भागातील गाव संबूकातील अधिकाऱ्यांनी २०१९ मध्ये सतत कमी होत असलेल्या लोकसंख्येच्या समस्येवर तोडगा म्हणून ही खास योजना आणली आहे. 

(Image Credit : DailyMail)

orissapost.com ने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी असे ठरवले की, गावात रिकामी असलेली घरे केवळ एक यूरो म्हणजे जवळपास ८० रूपयांना विकायचे. यूरोपातील अनेक छोट्या गावांप्रमाणेच संबूकामध्येही लोकसंख्या कमी होत आहे. सध्या या गावाची लोकसंख्या केवळ ५,८०० इतकी आहे. येथील स्थानिक लोक एकतर शेजारील शहरात जात आहेत किंवा दुसऱ्या देशात जात आहेत. 

त्यामुळे येथील नगर परिषदेने जुनी रिकामी घरे विकत घेऊन जगभरातील लोकांना ही घरे कमी किंमतीत विकण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून लोक इथे राहण्यासाठी यावेत. तसेच या माध्यमातून जगभरातील लोकांना इटलीमध्ये राहण्याचं त्यांचं स्वप्नही पूर्ण करता येईल.

(Image Credit : cnn.com)

संबूका गावातील महापौर लिओनार्डो सिकासियो सांगतात की, 'आधी नगर परिषदेने कायदेशीररित्या रिकामी घरे विकत घेतली. त्यानंतर आधी १६ घरांचा लिलाव केला. ही सर्वच घरे परदेशातील लोकांनी खरेदी केलीत. ही योजना सफल झाली. जगभरातील अनेक कलाकारांनी यात इंटरेस्ट दाखवला आणि संबूकामध्ये येऊन वसले'. 

एक यूरो म्हणजेच केवळ ८० रूपयांमध्ये घरे मिळत असल्याच्या या योजनेमुळे संबूका गाव रातोरात प्रसिद्ध झालं. योजनेच्या सुरूवात करण्यात आल्यावर आतापर्यंत ४० घरे विकण्यात आली आहेत. संबूकामध्ये घरे खरेदी करणाऱ्यांमध्ये केवळ परदेशीच नाही तर इटलीतीलही काही लोक आहेत. 

Web Title: Buy a house in this Italian village for just Rs 80

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.