४६ वर्षाआधी हरवलं होतं महिलेचं पाकीट, आता ते तिला सापडलं; वाचा कसं...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 01:33 PM2021-06-08T13:33:04+5:302021-06-08T13:36:56+5:30
कर्मचारी टॉप स्टीवन म्हणाला की, हे पाकीट मला साफसफाई करताना कचऱ्यात सापडलं. ते उघडून पाहिलं तर त्यात जुना फोटो आणि इतर काही कागदपत्रे होती.
जर तुम्हाला विचारलं की, तुमची ४६ वर्षांआधी हरवलेली एखादी वस्तू तुम्हाला आठवते का? जसे की पैसे किंवा पर्स...या प्रश्नाचं उत्तर कदाचित कुणी होकारार्थी देतील. कारण इतक्या वर्षाआधीचं कसं कुणाच्या लक्षात राहू शकतं. पण समजा इतक्या वर्षाआधी हरवलेली तुमची वस्तू तुम्हाला आता मिळाली तर काय होईल?
अशीच एक घटना कॅलिफोर्नियातून समोर आली आहे. इथे १९७५ मध्ये एका महिलेचं पाकीट हरवलं होतं आणि ते तिला आता सापडलं आहे. वेंचुराची राहणारी महिला थिएटरमध्ये फिरायला गेली होती. तिथेच तिचं पाकीट हरवलं होतं. पाकीट हरवल्याचं तिला घरी आल्यावर समजलं होतं. शोधाशोध करण्यात आली. पण पाकीट काही मिळालं नाही. वेळ बदलत गेला आणि महिलाही पाकिटाबाबत विसरली.
आता २०२१ मध्ये दक्षिण कॅलिफोर्नियाच्या ऐतिहासिक मॅजेस्टिक वेंचुरा थिएटरमध्ये स्वच्छतेदरम्यान कचऱ्यात महिलेचं ते पाकीट सापडलं आहे. अशात इतक्या वर्षांनी महिलेला शोधणं अवघड होतं. पाकिटात कर्मचाऱ्याला महिलेचं आयडी प्रूफ मिळालं. पण तरीही तिची ओळख पटवणं अवघड होतं. अशात कर्मचाऱ्याने सोशल मीडियाची मदत घेतली. त्यानंतर असं काही झालं ज्याची अपेक्षाही नव्हती.
कर्मचारी टॉप स्टीवन म्हणाला की, हे पाकीट मला साफसफाई करताना कचऱ्यात सापडलं. ते उघडून पाहिलं तर त्यात जुना फोटो आणि इतर काही कागदपत्रे होती. या पाकिटात पैसे नव्हते. पण १९७३ मधील ग्रेटफूल डेड कॉन्सर्टचं एक तिकीट होतं. तसेच कोलीन डिस्टीन नावाच्या महिलेचं ड्रायव्हिंग लायसन्स होतं.
अशात कर्मचाऱ्याने थिएटरच्या फेसबुक पेजवर हे पाकीट सापडल्याची माहिती टाकली. ज्यानंतर ही पोस्ट व्हायरल झाली होती. अशात ही माहिती महिलेपर्यंत पोहोचली. त्यानंतर महिलेने थिएटरमध्ये कॉल करून सांगितलं की, हे पाकीट तिचं आहे.
महिलेने सांगितलं की, हे एकदम टाइम कॅप्सूल उघडण्यासारखंच होतं. हे पाकिट तिच्याकडून १९७४ मध्ये हरवलं होतं. त्यावेळी ती केवळ २० वर्षांची होती. या पाकिटात एका इव्हेंटचं पाच डॉलरचं तिकीट होतं, एक कविता आणि तिच्या आईचा फोटो होता. हे पाकीट मिळाल्यावर महिला भावूक झाली. कारण इतक्या वर्षांनी ते सापडलं.