कारची चावी वर फेकणं पडलं महागात, महिलेच्या चेहऱ्याची झाली अशी हालत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 03:35 PM2023-01-28T15:35:10+5:302023-01-28T15:35:20+5:30
कॅनडामधील एका महिलेला असं करणं महागात पडलं. गाडीची चावी तिच्या चेहऱ्यावर पडली. नुसती पडली नाही तर चेहऱ्यात घुसली आणि चेहरा रक्तबंबाळ झाला.
कारच्या चावीसोबत खेळण्याची अनेकांना सवय असते. जेव्हाही लोक आपली कार पार्क करतात तेव्हा लोक चावीसोबत वेगवेगळ्या प्रकारे खेळतात. काही लोक चावी बोटात अडकवून खेळतात तर काही लोक चावी हवेत उडवतात. पण कॅनडामधील एका महिलेला असं करणं महागात पडलं. गाडीची चावी तिच्या चेहऱ्यावर पडली. नुसती पडली नाही तर चेहऱ्यात घुसली आणि चेहरा रक्तबंबाळ झाला.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, उत्तर कॅनडामध्ये राहणारी 24 वर्षीय रेनी लॅरिविएर मॅकडॉनल्ड्सला जाण्याच्या तयारीत होती. तिने तिच्या एका मैत्रिणीलाही सोबत घेतलं होतं आणि कार घेण्यासाठी आपल्या घराखाली आली. तिची मैत्रीण चाव्यांचा गुच्छा सतत वर फेकत होती आणि कॅच करत होती. सोबतच दोघी बोलतही होत्या. तेव्हाच चाव्यांचा हा गुच्छा रेनी लॅरिविएरच्या चेहऱ्यावर पडला आणि चावी चेहऱ्यात घुसली.
समोर आलेल्या धक्कादायक फोटोंमध्ये दिसत आहे की, कारची एक चावी तिच्या गालाच्या आत घुसली आहे. जेव्हा तिचा एक्स-रे केला गेला तेव्हा चावी दीड इंच तिच्या नाकाजवळच्या जागेत घुसलेली दिसली. चावीमुळे अनेक नसाही फाटल्या होत्या. ज्यामुळे रक्त वाहत होतं. रेनी म्हणाली की, मला विश्वास बसला नाही की, चावी अशी चेहऱ्याच्या आत घुसेल. मला भीती वाटत होती की, मी आंधळी तर होणार नाही ना.
या घटनेनंतर तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. रेनी म्हणाली की, हे बघून डॉक्टर आणि नर्सही हैराण झाल्या. वेगवेगळ्या विभागातील डॉक्टर बघायला येत होते. कारण त्यांना विश्वास बसत नव्हता. काही डॉक्टरांनी माझे फोटो काढले.
रेनी म्हणाली, मला इतकी भीती वाटत होती की, पुन्हा पुन्हा हेच वाटत होतं की, कुणी चावी वर फेकली तर ती माझ्याच चेहऱ्यावर येऊन लागेल. इतकी भीती मला कधीच वाटली नाही. माझी मैत्रीण तर इतकी घाबरली होती की, सतत देवाचं नाव घेत होती. आता मला चिंता ही आहे की, माझ्या डोळ्यांची दृष्टी जाऊ नये. कारण जिथे जखम झाली आहे ती एकदम डोळ्याखाली आहे.