चोरलेल्या गाडीच्या मागच्या सीटवर दिसला चिमुरडा; यू-टर्न घेऊन चोरटा मुलाच्या आईवर ओरडला
By कुणाल गवाणकर | Published: January 22, 2021 06:08 PM2021-01-22T18:08:52+5:302021-01-22T18:10:32+5:30
चिमुरड्याला गाडीत एकटं कसं ठेवता? आईला लेक्चर देत चोरटा गाडी घेऊन फरार
ओरेगॉन: अमेरिकेच्या ओरेगॉनमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. एका चोरट्यानं कार चोरल्यानंतर त्यात लहान मूल असल्याचं लक्षात येताच थेट यू-टर्न घेतला. गाडी जिथून चोरली, तिथे येत त्यानं मुलाच्या आईची खरडपट्टी काढली. मुलाला तिच्याकडे सोपवलं आणि पुन्हा गाडी घेऊन फरार झाला. या अजब घटनेची सध्या ओरेगॉनमध्ये चर्चा आहे. चोरट्यानं चोरलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मात्र चोरटा अद्याप तरी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
लॉटरी विक्रेत्यालाच लागली लॉटरी; विक्री न झालेल्या तिकिटानं रातोरात झाला करोडपती
ओरेगॉनमध्ये असलेल्या बेवेरटॉनमध्ये एका चोरट्यानं मांस विक्री करणाऱ्या दुकानाबाहेरून कार पळवली. कारच्या मागील सीटवर एक ४ वर्षांचं मूल असल्याचं काही अंतर पुढे गेल्यावर त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यानं यू-टर्न घेतला. गाडी पुन्हा दुकानाजवळ आणली. लहान मुलाला गाडीत एकटं कसं सोडता? तुम्हाला मुलाची काळजी आहे की नाही?, अशा शब्दांत त्यानं चिमुरड्याच्या आईला लेक्चर दिलं. त्यानंतर आईनं कारमधून चिमुरड्याला बाहेर काढलं. यानंतर चोरटा गाडी घेऊन फरार झाला.
क्या बात! आता बुटांनीही दुश्मनांवर गोळ्या झाडू शकतील जवान, तयार झाला सर्वात हायटेक Footwear
बेवेरटॉन पोलिसांचे प्रवक्ते मॅट्ट हेंडरसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालक महिला अवघ्या मिनिटभरासाठी दुकानात गेली होती. तिची कार सुरूच होती. ही संधी साधून चोरट्यानं गाडी पळवली. मात्र थोड्याच वेळात तो कार घेऊन माघारी आला. लहान मुलाला कारमध्ये एकटं सोडून गेल्याबद्दल तो आईला ओरडला. मुलाला कारमधून बाहेर काढा, असं त्यानं आईला सांगितलं. आईनं मुलाला कारबाहेर काढताच चोरटा पुन्हा कार घेऊन पळाला.
पोलिसांनी पोर्टलँडपासून १० मैलावर चोरलेली गाडी ताब्यात घेतली. पण अद्याप चोरट्याला अटक करण्यात यश आलेलं नाही. कार मालक महिलेनं चोरट्याला पाहिलं आहे. पण त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता. मांस विक्री करणाऱ्या दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. त्यामुळे चोरट्याला शोधण्यात अडचणी येत आहेत. चोरानं कारमधील ४ वर्षांच्या मुलाला कोणतीही इजा पोहोचवलेली नाही.