बाबो! मालकाच्या वर्क फ्रॉम होममुळे मांजर पडली आजारी; डॉक्टरांनी सांगितलं हैराण करणारं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 06:33 PM2022-05-26T18:33:08+5:302022-05-26T18:36:26+5:30
मालकाच्या वर्क फ्रॉम होममुळे एक मांजर आजारी पडली आहे. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल पण हो हे खरं आहे. ड़ॉक्टरांनीच हे हैराण करणारं कारण सांगितलं आहे.
संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलं होतं. काहींना वर्क फ्रॉम होमचा अत्यंत फायदा झाला तर काहींनी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. याच दरम्यान एक अजब घटना समोर आली आहे. मालकाच्या वर्क फ्रॉम होममुळे एक मांजर आजारी पडली आहे. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल पण हो हे खरं आहे. ड़ॉक्टरांनीच हे हैराण करणारं कारण सांगितलं आहे.
25 वर्षीय हॅरी जॉन्स याच्याकडे एक मांजर असून ती त्याच्यासाठी खूप खास आहे. पण हॅरी जेव्हापासून घरून काम करू लागला तेव्हापासून त्याची मांजर विचित्र वागू लागली. एक दिवस तर मांजर रडू लागलं. त्यामुळे तो अस्वस्थ झाला. त्याला तिची चिंता वाटू लागली. घाबरलेल्या हॅरीने तिला घेऊन पशूतज्ज्ञांकडे धाव घेतली. प्राण्यांच्या डॉक्टरांनी मांजरीची तपासणी केली, त्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते हैराण करणारं होतं. तिच्या आजारपणाचं कारण दुसरंतिसरं काही नाही तर खुद्द हॅरीच होता. तो वर्क फ्रॉम होम करत असल्याने ती अशी वागत होती.
जेव्हा हॅरी ऑफिसला जायचा तेव्हा घरात तिच्या एकटीचं राज्य असायचं. संपूर्ण घरात ती आपल्या मर्जीने खेळायची, मस्ती करायची, हिंडायची. पण जेव्हापासून हॅरी घरातून काम करू लागला तशी तिला जागा कमी, घर लहान वाटू लागलं. तिचा दिनक्रम बदलला, स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं वाटू लागलं आणि हळूहळू तीसुद्धा बदलू लगली. तिचा स्वभाव बदलला, ती चिडचिड करू लागली. जेव्हा हॅरीचं ऑफिस सुरू होईल तेव्हा तिची ही समस्या आपोआप सुटेल असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.