चोरी करताना पकडला; लोकांनी कपाळावर 'मी चोर आहे'चा टॅटू काढला, आता पुन्हा केली चोरी...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 01:27 PM2022-11-30T13:27:39+5:302022-11-30T13:28:16+5:30
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात 'मेरा बाप चोर है' हा सीन पाहिला असेल, तसाच प्रकार घडला आहे.
तुम्ही अमिताभ बच्चन यांचा 'दिवार' चित्रपट पाहिला असेल. त्यात काही लोक अमिताभच्या हातावर 'मेरा बाप चोर है', असे गोंदवतात. तशाच प्रकारची घटना समोर आली आहे. चोरी करताना एका तरुणाला काही लोकांनी पकडले आणि त्याच्या कपाळावर 'मी चोर आहे' असे गोंदवले. तो टॅटू आजही त्याच्या कपाळावर आहे. विशेष म्हणजे, या तरुणाने आता पुन्हा एकदा चोरी करताना पकडले आहे.
काही वर्षांपूर्वी एका 22 वर्षीय तरुणाला सायकल चोरी करताना पकडले होते. मग त्या लोकांनी त्याच्या कपाळावर 'मी चोर आणि लूजर आहे,' असे गोंदवले. आता हा तरुण नुकताच पुन्हा एका घरात चोरी करताना पकडला गेला. तरुणाचे नाव रुआन रोचा दा सिल्वा आहे. ब्राझीलच्या स्थानिक भाषेत हा मजकूर तरुणाच्या कपाळावर लिहिला आहे.
'डेलीबीस्ट'च्या वृत्तानुसार, रुआनने रविवारी साओ पाउलोच्या कोटिया येथील घरात घरफोडी करण्यासाठी बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश केला. पण, तो पकडला गेला. चोरीचा प्रयत्न करताना रुआनही जखमी झाला. अटक केल्यानंतर त्याच्यावर उपचारही करण्यात आले. 2017 मध्ये दोन पुरुषांनी रुआनच्या कपाळावर 'मी चोर आणि लूजर आहे' असा टॅटू काढला होता.
रुआन रोचा दा सिल्वा हा एक व्यावसायिक चोर आहे. यापूर्वीही तो अनेकदा चोरी करताना पकडला गेला आहे. 2018 मध्ये त्याला बाजारातून डिओडोरंट चोरताना पकडण्यात आले होते. या गुन्ह्यासाठी त्याला काही दिवस तुरुंगवास भोगावा लागला होता. यानंतर 2019 मध्ये त्याला स्वेटशर्ट चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर मोबाईल चोरी करतानाही तो पकडला गेला. उपचारादरम्यान डॉक्टरांनी रुआनच्या कपाळावरील टॅटूचा काही भाग काढला आहे.