बाबो! लोणच्याच्या एका छोट्याश्या फोडीची किंमत ५ लाख रुपये, असं काय आहे या लोणच्यात?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 02:57 PM2022-08-05T14:57:52+5:302022-08-05T15:12:34+5:30
लोणच्याची ही फोड एका छताला चिकटवण्यात आली आहे. सीलिंगला चिपकलेल्या या फोडाची किंमत NZ$10,000 म्हणजे तब्बल 4 लाख 92 हजार रुपये आहे.
लोणच्याचा एक डबा घ्यायला गेलो तरी मोठ्यात मोठा डबाही आपल्या हजार रुपयांत मिळेल. पण सध्या सोशल मीडियावर एक लोणच्याची फोड चर्चेत आली आहे, जिची किंमत 5 लाख रुपये आहे. म्हणजे लोणच्याच्या मोठ्या डब्याच्याही कितीतरी पट अधिक किमतीला फक्त लोणच्याची एक फोड... फक्त वाचूनच आपल्याला चक्कर आली असेल. असं या लोणच्याच्या फोडीत काय खास आहे हे जाणून घेण्याचीही तुम्हाला उत्सुकता असेल.
लोणच्याच्या एका फोडेचा लिलाव केला जातो आहे. न्यूझीलँडच्या ऑकलँडमध्ये होणाऱ्या ललित कला सिडनी प्रदर्शनातील चार आर्टवर्कपैकी हे एक आर्टवर्क आहे. इन्स्टाग्राम पेजवरही याची माहिती दिली आहे. लोणच्याची ही फोड एका छताला चिकटवण्यात आली आहे. सीलिंगला चिपकलेल्या या फोडाची किंमत NZ$10,000 म्हणजे तब्बल 4 लाख 92 हजार रुपये आहे.
ऑस्ट्रेलियन कलाकार मॅथ्यू ग्रिफिनचं हे आर्टवर्क आहे. मॅथ्यूने लोणच्याची ही फोड कडोनाल्ड्सच्या चीज बर्गरमधून काढली होती. सॉसच्या मदतीने त्याने ही फोड छताला चिकटवली आणि आर्टवर्क म्हणून त्याला पिकल असं नाव दिलं. ज्याचा आता लिलाव होतो आहे.
रिपोर्टनुसार हे विचित्र आर्टवर्क पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. कुणी याचं कौतुक केलं आहे तर कुणी याला बकवास म्हटलं आहे. एका युझरने मी लहान असताना मॅकडोनाल्डसमध्ये असा प्रताप केल्याने मला पोलिसांनी पकडलं होतं आणि आज हे आर्ट झालं अशी कमेंटही केली आहे.