छास खास
By Admin | Published: April 2, 2017 01:17 AM2017-04-02T01:17:05+5:302017-04-02T01:17:05+5:30
यावर्षी मार्चमध्येच प्रखर उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी काहीतरी थंड प्यावे असेही वाटते. सध्या लिंबूू, कोकम सरबतांपासून पन्हे, पीयूष पर्यत कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत
यावर्षी मार्चमध्येच प्रखर उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी काहीतरी थंड प्यावे असेही वाटते. सध्या लिंबूू, कोकम सरबतांपासून पन्हे, पीयूष पर्यत कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. असे असले, तरी ताकाची मजा काही वेगळीच.
मार्च महिन्यातला हा उन्हाळा अगदी सर्वांच्या चांगलाच लक्षात राहील. प्रचंड ऊन आणि झळा. अत्यंत उबग येईल, असे वातावरण सगळ््यांनीच या आठवड्यात अनुभवलं. हा ऊन्हाचा सामना करत असताना, व्हॉट््सअप, फेसबुक अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऊन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी काय-काय प्यायला हवे, याची माहितीपत्रिकाच फिरत होती. त्यात सोडायुक्त पेये टाळून घरगुती पेयांवर भर दिला होता आणि त्यात ताकाचाही समावेश होता. याचाच अर्थ, ताक पिणे हे शरीरासाठी अत्यंत फायद्याचे आहे, पण आलेल्या मॅसेजमुळे ताकाचे महत्त्व वाढले आहे का? तर अजिबात नाही. कारण ताक तर आपण कित्येक वर्षे पित आहोत.
‘ताक’ या शब्दामागची मजा फार कमी जणांना माहीत असेल. ताकाचा मूळ शब्द "तक्र". चक्र म्हणजेच चाक असते, अगदी त्याप्रमाणे "तक्र" म्हणजे "ताक". तक् म्हणजे तग. थकव्यापासून रक्षण करते ते "तक्र". आयुर्वेदातदेखील हेच सांगितले आहे. म्हणून ताक आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. उन्हाळ््यातील वातावरणात शरीरातील उष्णता कमी करून शरीराचे तापमान समतोल राखण्यास ताक मदत करते.
घरी कवड्या दहीत पाणी घालून ते रवीने घुसळून फेसाळ झालेले ताजे ताक पिण्याची मजा काही औरच. लहानपणी आई, आजी ताक करण्यासाठी भांड्यातले दही रवीने घुसळताना होणारा तो डुबुक डुबुक आवाज आजही आपलासाच वाटतो. त्या वेळी आम्हा भावंडांचा ताजे लोणी खाण्यासाठी हट्ट असायचा. ते लुसलुसीत लोणी खाताना बरोबर थोडसे ताकही प्यायले जायचे. जेवणाआधी वाटीभर ताक पिताना ताजेतवाने होऊन आम्ही खेळायला पळत असू.
ऊन्हातून कामाला बाहेर पडताना थकलेल्या देहाला काहीतरी प्यायची इच्छा होते. अशा वेळी ठेल्यावर जर पांढऱ्या शुभ्र फेसाळ ताकाचे ग्लास भरलेले दिसले की, साहजिकच पावले तेथे वळतात. हे ताक प्यायल्यावर मात्र, नक्कीच शांत आणि हलके वाटते. हे ताक किती वेगवेगळ््या प्रकाराने आपण पित असतो. मीठ , सैंधव मीठ, हिंग, धने-जिरे पावडर, चाट मसाला असे प्रकार घालून ताकाला जी चव येते ती अफलातूनच. आल्याचा हलकासा तिखटपणा आणि मिरची-कोथिंबिरीचे मिश्रण असलेला "मठ्ठा", तसेच मसाला छासची मजाही काही औरच. या ताकापासून कढी, सोलकढी, लस्सीही तयार होते. लस्सीविषयी पुढे पाहणार आहोतच, पण थोडक्यात काय, तर ताक कुठल्याही प्रकारात प्यायले, तरी त्याचे जे थकवा घालवण्याचे काम आहे, ते पूर्ण होतच असते.
ताक फक्त महाराष्ट्रातच नाहीत, तर अगदी भारतभरात सगळीकडे प्रचंड लोकप्रिय आहे. पंजाबपासून दक्षिण भारत, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश अशा सगळीकडेच ताक मिळते. त्या-त्या भागांची खासियतही त्यात पुरेपूर उतरलेली असते. ताकाने आरोग्याच्या दृष्टीने आपले महत्त्व राखले आहे, म्हणूनच तर आज तृष्णा भागवण्यासाठी कितीही पेये आली असली, तरी ताकाचे महत्त्व हे अबाधित आहे, यात शंकाच नाही.
स्मोकी चव
मुंबईत अनेक ठिकणी स्मोकी फ्लेवरचे ताक हा नवा प्रकार आता मिळतो. गिरगावात साहित्य संघाबाहेर "ताक स्टेशन"ला हे ताक प्यायले. विक्रेता प्रसाद वेदपाठकने छोट्या वाटीत कोळसा स्मोक करून, त्यावर ओवा टाकला. जसा धूर यायला सुरुवात झाली, तसा एक काचेचा ग्लास त्यांनी त्यावर २ मिनिटे ठेवून दिला. ग्लासात पूर्ण धूर गेल्यावर, मग दुसऱ्या ग्लासातील ताक घालून खालीवर करून लगेच प्यायले दिले. ताकाच्या गोड चवीबरोबर कोळशाच्या चवीचा स्मोकी फ्लेवर एकदम वेगळाच आणि मस्त लागत होता. यात कोळशात स्मोक करताना, ओव्याऐवजी हिंग किंवा जिरेही वापरता येऊ शकते. लोकांना बदल म्हणून हे ताक प्यायला आवडते, असे प्रसादने सांगितले.
- भक्ती सोमण