आई नसलेलं अनोखं गाव, इथे वडील सांभाळतात घर तर आई जाते परदेशात!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 12:52 PM2019-05-16T12:52:49+5:302019-05-16T12:59:46+5:30
घर म्हटलं की, सामान्यपणे सर्वच घरात आई असतेच. आईशिवाय घराची कल्पना देखील करवत नाही. पण पूर्व इंडोनेशियात एक असं गाव आहे, जे आई नसलेलं गाव आहे.
(Image Credit : www.bbc.com)
घर म्हटलं की, सामान्यपणे सर्वच घरात आई असतेच. आईशिवाय घराची कल्पना देखील करवत नाही. पण पूर्व इंडोनेशियात एक असं गाव आहे, जे आई नसलेलं गाव आहे. कारण या गावातील जवळपास सर्वच माता दुसऱ्या देशांमध्ये नोकरी करण्यासाठी गेल्या आहेत. इंडोनेशियातील लोक या गावाला आई नसलेलं गाव म्हणतात. आता गावात मुला-मुलींची आईच नाही म्हटल्यावर त्यांना सांभाळण्याची जबाबदारी ही वडिलांवर आहे. जास्तीत जास्त घरांमध्ये हीच स्थिती असल्याने शेजारी एकमेकांच्या मुला-मुलींना सांभाळण्यास मदत करतात.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, आता सांभाळ करणारी आईच नाही म्हटल्यावर येथील मुला-मुलींना रोजच्या जगण्यात अनेक अडचणी येतात. इथे काही मुलं-मुली असेही आहेत ज्यांचे आई आणि वडील दोघेही परदेशात नोकरी करण्यासाठी गेलेत. त्यांना राहण्याची आणि शिक्षणाची सोय असलेल्या संस्थांमध्ये ठेवण्यात आलं आहे. अशा शाळा येथील स्थानिक महिला आणि मायग्रेंट संस्थांकडून चालवल्या जातात.
परदेशात महिलांसोबत अत्याचारांच्या घटना
जास्तीत जास्त महिलांचा परदेशात नोकरीला जाण्याचा उद्देश हा आपल्या मुला-मुलींना चांगलं जीवन देण्याचा आहे. येथील जास्तीत जास्त पुरूष हे शेती आणि मजूरी करून घर चालवतात. तर महिला परदेशात घरगुती कामे किंवा लहान मुलांना सांभाळण्याचं काम करतात. या भागातून महिलांचं परदेशात जाणं १९८० पासून सुरू झालं.
आईपासून दूर मुलांच्या वेदना
परदेशात नोकरी करणाऱ्या काही महिला घरी परत येतात. कारण त्यांच्यावर अनेकदा गैरवर्तन, अत्याचार होतात. याबाबत काही नियमही तिकडे नाहीत. कधी कधी तर काही महिला थेट मृतावस्थेत गावी आणल्या जातात. तर काही महिलांना कामाच्या ठिकाणी मारझोड केली जाते. तसेच काही महिलांना कामाचा मोबदला न देताच परत पाठवलं जातं. जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले जातात. त्यामुळे गावातील मुला-मुलींच्या दिसण्यातही फरक दिसून येतो.
१८ वर्षांची फातिमा येथील दुसऱ्या मुला-मुलींपेक्षा वेगळी आहे. लोक तिला वेगळ्या नजरेने बघतात. लोक तिला म्हणतात की, ती फार सुंदर आहे कारण तू अरब आहेस. तिला यावरून शाळेत चिडवलं सुद्धा जातं. फातिमा सांगते की, तिने तिच्या सौदीमध्ये राहणाऱ्या वडिलांना कधीच पाहिलं नाही. पण ते मला पैसे पाठवत होते. काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. आमचं जगणं फार कठीण झालं आहे. आईने सौदी अरबमध्ये दुसरी नोकरी शोधली आहे.
(एली सुसियावटी) (Photo Credit : BBC)
तर दुसरी तरूणी एली सुसियावटी सांगते की, जेव्हा मी ११ वर्षांची होती तेव्हा माझी आई मला आजीकडे सोडून गेली होती. आई-वडील वेगळे झाल्याने मला आईकडे सोपवण्यात आलं होतं. आई मार्शिया सौदी अरबमध्ये हेल्परची नोकरी करते. एली ही वानासाबा नावाच्या गावात जाते आणि ती शाळेत शिकते आहे.