कमालच! झोपेत असताना नाकातून शरीरात शिरलं झुरळ, व्यक्तीला पत्ताच नाही आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 05:16 PM2024-09-06T17:16:12+5:302024-09-06T17:18:27+5:30
तोंड उघडं ठेवून झोपल्याने व्यक्तींसोबत अनेक अजब घटना घडल्याचं तुम्ही ऐकलं किंवा वाचलं असेल. अशीच एक घटना सध्या चीनमधून समोर आली आहे.
बऱ्याच लोकांना फार गाढ झोपण्याची सवय असते. त्यांची झोप अशी असते की, त्यांच्यासोबत काय झालं किंवा होत आहे हे त्यांना माहीत नसतं. बरेच लोक तोंड उघडं ठेवून झोपतात. तर काही लोकांना झोपेत चालण्याची सवय असते. तरीही एखादा कीटक किंवा जीव शरीरावर चालत असेल तर थोडंतरी जाणवतं.
मात्र, काही लोकांना हेही नाही समजत. तोंड उघडं ठेवून झोपल्याने व्यक्तींसोबत घडलेल्या अनेक अजब घटना तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. अशीच एक घटना चीनमधून समोर आली आहे. इथे एका व्यक्तीच्या नाकातून झुरळ आत गेलं आणि त्याला त्याची काही कल्पनाच नव्हती.
ऑडिटी सेंट्रल वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये राहणारी व्यक्ती झोपली होती. तेव्हाच नाकावाटे एक झुरळ त्याच्या शरीरात शिरलं. ५८ वर्षीय हाइकोउ नावाची ही व्यक्ती हेनान प्रांतात राहते. त्याने झोपेत मोठा श्वास घेतला आणि झुरळ आत गेलं. तो झोपेतून जागा झाल्यावर त्याला नाकात काही वळवळलं. त्याला जाणवलं की, नाकात काहीतरी चालत आहे आणि नंतर ते घशात जात आहे. पण त्याने याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा झोपला. नंतर त्याला श्वासाची दुर्गंधी जाणवू लागली होती.
श्वासनलिकेत अडकलं होतं झुरळ
या व्यक्तीने तीन दिवस याबाबत काहीच केलं नाही. तीन दिवसांनी त्याला खोकला येऊ लागला होता. तसेच पिवळ्या रंगाचा कफही येऊ लागला होता. तेव्हा तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याचं सीटी स्कॅन केलं. स्कॅनमधून समजलं की, त्याच्या श्वासनलिकेत काहीतरी अडकलेलं आहे. झुरळाचे पंख स्कॅनमध्ये दिसत होते आणि नंतर पूर्ण झुरळच दिसलं. डॉक्टरांनी हे झुरळ श्वासनलिकेतून काढलं आणि अवयव स्वच्छ केला. एक दिवसानंतर व्यक्तीला घरी सोडण्यात आलं. डॉक्टर म्हणाले की, ही फारच अजब केस होती आणि याआधी असं कधी पाहिलं नव्हतं