हातोडा समजून ज्याचा २० वर्ष केला वापर, तो निघाला बॉम्ब; महिला त्याने तोडत होती अक्रोड!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 12:15 PM2024-07-03T12:15:36+5:302024-07-03T12:20:56+5:30
ही घटना तर इतकी भयावह आहे की, तुम्हीही कपाळावर हात मारून घ्याल. जी वस्तू ही महिला हातोडा म्हणून वापरत होती ती भलतंच काही निघाली.
अनेकदा असं होतं असतं की, एखादी वस्तू बाहेरून खरेदी करून आणण्याऐवजी आपण त्या वस्तूची पर्यायी वस्तू वापरतो. अशी अनेक उदाहरणे बघायला मिळतात. तुम्हीही घरात स्क्रू ड्रायव्हर नसेल तर चमच्याच्या टोकाने स्क्रू काढत असाल किंवा टाइट करत असाल. पण असं करणं अनेकदा घातकही ठरतं. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं. ही घटना तर इतकी भयावह आहे की, तुम्हीही कपाळावर हात मारून घ्याल. जी वस्तू ही महिला हातोडा म्हणून वापरत होती ती भलतंच काही निघाली.
महिला गेल्या २० वर्षापासून एका हातोड्याचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी करत होती. कधी खिळे ठोकायला तर अक्रोड फोडायला तर कधी इतर तोडण्यासाठी. पण जेव्हा तिला या हातोड्याचं सत्य समजलं तेव्हा तिला धक्का बसला. कारण यामुळे तिचा जीवही जाऊ शकला असता. पण सुदैवाने असं काही झालं नाही.
ऑडिटी सेंट्रलच्या एका वृत्तानुसार, ही घटना चीनमधील आहे. इथे राहणारी ९० वर्षीय महिला आपल्या जीवनातील दोन दशकं एक मोठी चूक करत राहिली. अशी चूक ज्याचा तिने कधी विचारही केला नसेल.
महिलेचं नाव क्विन आहे आणि ती चीनच्या हुबेई प्रांतातील शियांगयांगमध्ये राहते. महिलेला शेतात एक लोखंडी वस्तू सापडली. या वस्तूचा वापर ती अनेक कामांसाठी हातोडा म्हणून करत होती. काही दिवसांआधी जेव्हा तिचं जुनं घर तोडण्यासाठी काही लोक गेले तेव्हा त्यांना हा हातोडा दिसला. त्यांना बघताच समजलं की, ज्याला ही महिला हातोडा समजत होती तो हॅंड ग्रेनेड म्हणजे हात बॉम्ब आहे. त्याचा ती २० वर्षापासून वापर करत होती.
बॉम्बने तोडत होती अक्रोड
महिलेने सांगितलं की, ती याचा वापर मसाले बारीक करण्यासाठी, ड्राय फ्रूट तोडण्यासाठी, खिळे ठोकण्यासाठी करत होती. आता जेव्हा या हॅंड ग्रेनेडबाबत घटना समोर आली तेव्हा पोलीस तिच्या घरी पोहोचले आणि बॉम्ब चौकशीसाठी पाठवला. चौकशीतून समोर आलं की, हा खरंच चायनीज टाइप ६७ हॅंड ग्रेनेड आहे. पोलिसांनी सांगितलं की, हा बॉम्ब आता डिस्ट्रॉय करण्यात आला आहे. महिला खरंच नशीबवान ठरली की, तिला याने काही झालं नाही.