अबब! कंपनीने तयार केला 314 कोटी रूपयांच्या नोटांचा डोंगर आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 01:01 PM2019-01-24T13:01:43+5:302019-01-24T13:06:36+5:30
सर्वातआधी कंपनीने नोटांचा एक डोंगर तयार केला. यासाठी त्यांना ३१४ कोटी रुपये लागतेल. त्यानंतर कंपनीने जे केलं ती प्रत्येक कर्मचाऱ्याची इच्छा असते.
चीनमधील वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी चीनमधील दोन कंपन्या महिला कर्मचाऱ्यांना 'डेटिंग लिव्ह' देण्यासाठी चर्चेत आल्या होत्या. तर एका कंपनीने कर्मचाऱ्यांना टार्गेट पूर्ण न केल्याने दिलेली शिक्षा चर्चेत होती. आता येथील एका कंपनीने फार अनोख्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना बोनसचे वाटप केले. सर्वातआधी कंपनीने नोटांचा एक डोंगर तयार केला. यासाठी त्यांना ३१४ कोटी रुपये लागतेल. त्यानंतर कंपनीने जे केलं ती प्रत्येक कर्मचाऱ्याची इच्छा असते. या कंपनीने नोटांच्या डोंगरातील सर्व रक्कम कर्मचाऱ्यांमध्ये बोनस म्हणून वाटली.
चीनच्या जियांग्शी प्रांतातील एका स्टील कंपनीने हा अनोखा कारनामा केला. कंपनीने ३०० मिलियन युआनचा 'कॅश माउंटेन' तयार केला. भारतीय मुद्रेनुसार त्यांना यासाठी ३१५ कोटी इतकी रक्कम लागली. नोटांचा हा डोंगर पाहून तिथे उपस्थित लोकांनी तोंडात बोटे घातली. सध्या सोशल मीडियात या नोटांच्या डोंगराची चांगलीच चर्चा रंगली आहे.
या नोटांच्या डोंगरासाठी वापरण्यात आलेली सर्व रक्कम या कंपनीने त्यांच्या ५ हजार कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून वाटली. प्रत्येक कर्मचाऱ्याला सरासरी ६८ हजार रुपये बोनस मिळाला. ही रक्कम गेल्यावर्षी मिळालेल्या बोनसच्या रकमेच्या दुप्पट आहे.
एकाला मिळाले ६२ लाख रुपये
या कंपनीमध्ये एका नशीबवान कर्मचाऱ्याला दरवर्षी ६० हजार युआन म्हणजेच ६२ लाख रूपये बोनस दिला जातो. हा बोनस चीनमध्ये चायनीज न्यू इअर दरम्यान दिला जातो. हे पहिल्यांदाच नाहीये की, एखाद्या चीनी कंपनीने अशाप्रकारे कर्मचाऱ्यांना बोनस दिले. गेल्यावर्षी कंपनीने कॅश गेम शो ठेवला होता. यात कर्मचारी त्यांना हवी तितकी रक्कम जिंकू शकत होते.