पैसे वाचावे म्हणून 8 लोकांच्या परिवाराने हॉटेलला बनवलं घर, रोज देतात 11 हजार रूपये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 11:23 AM2024-01-11T11:23:53+5:302024-01-11T11:24:28+5:30
परिवाराचं यावर म्हणणं आहे की, हे त्यांना भाड्याच्या अपार्टमेंटपेक्षाही स्वस्त पडत आहे.
सध्या आठ सदस्यांच्या एका परिवाराची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. फॅमिलीने आपलं पुढचं सगळं जीवन एक स्थायी अपार्टमेंट सोडून हॉटेलमध्ये घालण्याचा निर्णय घेतला. खास बाब ही आहे की, या आलिशान हॉटेलमध्ये राहण्यासाठी ही फॅमिली दररोज 1000 युआन म्हणजे 11000 रूपये देत आहे. परिवाराचं यावर म्हणणं आहे की, हे त्यांना भाड्याच्या अपार्टमेंटपेक्षाही स्वस्त पडत आहे. हेच कारण आहे की, ही फॅमिली सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
परिवाराचा बचतीचा नवा फंडा
साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, हा परिवार हेनानमधील मध्य प्रांत नान्यांग शहरातील एका हॉटेलमध्ये राहत आहे. जिथे ते दर दिवसाला 1000 युआन म्हणजे 11000 रूपये देत आहेत. घरात राहण्याऐवजी हा परिवार गेल्या 229 दिवसांपासून एका लक्झरी हॉटेलमध्ये राहत आहे. हॉटेलमध्ये त्यांनी एक सुइट बुक केला आहे. ज्यात दोन रूम, आणि एक लिव्हिंग रूम आहे. ते म्हणतात की, यामुळे त्यांची पैशांची बचत तर होतेच सोबतच त्यांना तेवढ्याच पैशात वीज, पाणी आणि कार पार्किंगची सुविधा मिळत आहे.
परिवाराने हॉटेलला बनवलं घर
असं सांगण्यात आलं की, परिवारातील सदस्य ज्या रूम्समध्ये राहतात त्यात सोफा, खुर्ची, पाणी, खाण्याचे पदार्थांसोबत अनेक गोष्टी आहेत. परिवाराचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात परिवारातील एक सदस्य म्यू जू सांगत आहे की, आज हॉटेलमध्ये आमचा 229 वा दिवस आहे. दर दिवसालं याचं भाडं 1000 युआन आहे. आठ लोकांचा आमचा परिवार चांगल्या पद्धतीने यात राहत आहे. ते असंही म्हणाले की, भाड्यामध्ये हॉटेलने त्याना सूटही दिली आहे. कारण त्यांना इथे जास्त काळासाठी रहायचं आहे.
परिवाराकडे आहे सहा प्रॉपर्टी
परिवारातील सदस्य म्यू जू ने सांगितलं की, जीवन जगण्याची ही पद्धत पैसे वाचवण्यासाठी मदत करेल. त्यांचं मत आहे की, हा निर्णय फार सुविधाजनक आहे. त्यांना या नव्या घरात फार आनंद मिळतो आहे. याच कारणाने परिवाराने आपलं पुढचं आयुष्य या हॉटेलमधील नव्या घरात राहण्याला सहमती दर्शवली आहे. म्यू ने व्हिडिओत सांगितलं की, त्यांच्या परिवाराकडे सहा प्रॉपर्टी आहे आणि ते आर्थिक रूपाने संपन्न आहेत.
नान्यांगमध्ये एका अपार्टमेंट भाडं किती आहे हे तर स्पष्ट नाही. पण सांगितलं जात आहे की, दोन बेडरूम असलेल्या अपार्टमेंटसाठी चीनच्या शांघायमध्ये 20,000 युआन द्यावे लागत म्हणजे 2.37 लाख रूपये. ज्यात काही सुविधाही नाहीत. या हिशोबाने नान्यांगमध्ये परिवार महिन्याला साडे तीन लाख रूपये देत आहेत. तरीही त्यांना ही डील फायद्याची वाटत आहे.