अर्धवट शिजवलेला मासा खाणं महागात पडलं; चिनी व्यक्तीनं निम्मं यकृत गमावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 04:05 PM2020-07-22T16:05:51+5:302020-07-22T16:07:23+5:30
चार महिन्यांपासून अतिसार, ओटापोटात त्रास होऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल होण्याची वेळ
बीजिंग: चीनमधून संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोनामुळे सगळेच हैराण झाले आहेत. चीनच्या वुहानमधून कोरोना सर्वत्र पसरला. आतापर्यंत दीड कोटीहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून ६ लाखांपेक्षा अधिक जणांनी कोरोनामुळे प्राण गमावला आहे. चीनमधील मांस बाजारातून कोरोना पसरल्याचा संशय आहे. मात्र चीननं याचा इन्कार केला आहे. चिनी नागरिकांच्या खाद्यसंस्कृतीमुळे कोरोनाचं संकट ओढावल्याचा आरोप झाला. अनेक तज्ज्ञांनीदेखील याबद्दल संशय उपस्थित केला. यानंतर आता चीनमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे.
अर्धवट शिजवलेला मासा खाल्ल्यामुळे एका चिनी व्यक्तीला त्याचं निम्मं यकृत गमावावं लागल्याची घटना हांगझोऊमध्ये घडली. माशाच्या पोटात असलेल्या कृमींनी अंडी घातल्यानं हा संपूर्ण प्रकार घडल्याचं वैद्यकीय अहवालांतून समोर आलं. त्यामुळे अर्धवट शिजलेला मासा खालेल्या व्यक्तीला अतिसार, थकवा आणि ओटीपोटात त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याला फर्स्ट पीपल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
जवळपास ४ महिने रुग्णाला त्रास होत असल्यानं डॉक्टरांनी तातडीनं उपचार सुरू केले. त्यावेळी त्यांना रुग्णाच्या यकृतात पू आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे यकृतात १९ सेंटिमीटर लांब आणि १८ सेंटिमीटर रुंद भागात पू पसरला होता. याशिवाय या भागात गाठीदेखील तयार होऊ लागल्या होत्या. यानंतर विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यामधून रुग्णाला क्लोनोरकिआसिस झाल्याचं निष्पन्न झालं. कृमींमुळे हा आजार होतो.
रुग्णाचं यकृत वाचवण्यासाठी डॉक्टरांनी त्यातील सर्व द्रव पदार्थ काढला. यानंतर डॉक्टरांनी यकृत कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र यकृतावरील गाठी तीन आठवड्यांनंतरही कायम राहिल्या. इतर कोणताही पर्याय नसल्यानं डॉक्टरांना यकृताचा बाधित भाग काढावा लागला. यामध्ये कृमींची अंडी आढळून आली. आपण अर्धवट शिजवलेला मासा खाल्ल्याची माहिती रुग्णानं डॉक्टरांना दिली. या माशाच्या पोटात असलेल्या कृमींनी रुग्णाच्या पोटात अंडी दिल्यानं हा संपूर्ण प्रकार घडल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.