बापरे! इमारतीच्या १५ व्या मजल्यावर गांज्याची शेती, ४ लाख रुपये किलो ने विकायचा गांजा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 05:04 PM2020-04-06T17:04:40+5:302020-04-06T17:18:09+5:30
या व्यक्तीने इमारतीच्या १५ व्या मजल्यावर गांज्याची ८० झाडं लावली होती. ही झाडं इज्राईलच्या पद्धतीने लावली होती.
राजस्थानच्या जयपूरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी एका इमारतीच्या १५ व्या मजल्यावर गांज्याची शेती केली जात होती. या घटनेतील आरोपी हा इज्राईल देशाचा नागरिक आहे. जयपूर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने इमारतीच्या १५ व्या मजल्यावर गांज्याची ८० झाडं लावली होती. ही झाडं इज्राईलच्या पद्धतीने लावली होती.
या व्यक्तीचे नाव एलोन मोली आहे. पोलिस अधिकारी लखन खटाना आणि सुरेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली याला अटक करण्यात आली. तपासणीत समोर आलं की, या व्यक्तीने ही जागा भाड्य़ाने घेतली होती. अमेरिकेतून ६०० डॉलरची बियाणी आणि खत ऑनलाईन मागवून गांज्याची शेती सुरू केली होती. तसंच त्या व्यक्तीने या शहरातील भांकरोटा आणि राजापार्क या ठिकाणी दोन फ्लॅट भाड्याने घेतले होते. या फ्लॅटचं भाडं ३७ हजार होतं.
या भामट्याने स्वतः कृषी वैज्ञानिक असून रिसर्च करत असल्याचे सांगून लोकांना फसवले. गांजा लावलेल्या जागेत ग्रीन हाऊस आहे. असं सांगून लोकांना मुर्ख बनवत होता. हा गांजा आरोपी चार लाख रुपये किलोने विकायचा . इलेक्ट्रोनिक काटा पण त्याठिकाणी पोलिसांना मिळाला. १० -१० ग्रामचे पाकिट तयार करून आरोपी गांजा विकत होता. २००४ मध्ये बिजनेस व्हिसाचा वापर करत हा व्यक्ती भारतात आला. त्यानंतर फर्नीचरचं काम होता. अखेर पोलिसांनी या आरोपीचा पितळ उघडं पाडून अटक केली आहे.