सावळागोंधळ! नवरदेवासह संपूर्ण वऱ्हाड रात्रभर गावात फिरलं; पण नवरीचं घर सापडलचं नाही
By प्रविण मरगळे | Published: December 14, 2020 11:17 AM2020-12-14T11:17:50+5:302020-12-14T11:18:40+5:30
घडलेल्या प्रकारामुळे नवरदेवाकडील मंडळींचा राग अनावर झाला आणि त्यांनी लग्नात मध्यस्थी करणाऱ्या महिलेला शनिवारी रात्री पकडून बंधक बनवलं
वाराणसी – सध्या उत्तर प्रदेशात लग्नाचा सीझन आहे. अशातच राज्यातील आजमगढमध्ये अजबगजब घटना पाहायला मिळाली आहे. लग्नाचं स्वप्न पाहणाऱ्या नवरदेवाला मोठा धक्का बसला. आजमगढमध्ये राहणाऱ्या एका युवकाचं लग्न १० डिसेंबर रोजी मऊ जिल्ह्यातील एका युवतीसोबत ठरलं होतं. लग्नाच्या रात्री नवरदेव संपूर्ण वऱ्हाड घेऊन मऊ जिल्ह्यातील होणाऱ्या नवरीच्या गावात गेला, परंतु संपूर्ण रात्रभर फिरले तरीही वऱ्हाडाला नवरीचं घर सापडलं नाही वा तिच्या कुटुंबाची कोणतीही माहिती मिळाली नाही, त्यामुळे मजबुरीनं संपूर्ण वऱ्हाडाला निराश होऊन माघारी परतावं लागलं.
घडलेल्या प्रकारामुळे नवरदेवाकडील मंडळींचा राग अनावर झाला आणि त्यांनी लग्नात मध्यस्थी करणाऱ्या महिलेला शनिवारी रात्री पकडून बंधक बनवलं, कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये या प्रकारामुळे खळबळ माजली, महिलेचा दावा आहे की, नवरीच्या कुटुंबाने तिचीही फसवणूक केली आहे. या प्रकारावर वरिष्ठ पोलीस अधिकारी शमशेर यादव म्हणाले की, नवरदेवाच्या कुटुंबाने लग्न ठरवणाऱ्या महिलेच्याविरोधात गंभीर आरोप लावले आहेत. आम्ही दोघांनाही समस्या सोडवण्याची संधी दिली, शनिवारी रात्री दोघांमध्ये समझौता झाला आणि नवरदेवाच्या कुटुंबाने महिलेविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल केली नाही.
नवरदेवाचे कुटुंब छतवारा येथे राहणाऱ्या एका महिलेच्या संपर्कात आलं, या महिलेने मुलाचं लग्न ठरवण्याचं आश्वासन दिलं, त्यानंतर मऊ जिल्ह्यातील मुलीचं स्थळ पाहण्यात आलं, दोन्ही कुटुंब लग्नासाठी तयार झालं, मात्र लग्नाआधी मुलाचं कुटुंब मुलीच्या घरी न गेल्याने सगळा गोंधळ उडाला. लग्नाची तारीख ठरली, मुलाच्या कुटुंबाने मुलीकडील मंडळींना बँडबाजा आणि अन्य कार्यासाठी २० हजार रुपये दिले होते.