Corona: बापरे! कोरोना संपवण्यासाठी चक्क बर्फाच्या पाण्यात आंघोळ; जपानी लोकांनी ‘असं’ का केलं?
By प्रविण मरगळे | Published: January 12, 2021 02:20 PM2021-01-12T14:20:42+5:302021-01-12T14:22:42+5:30
काही देशांनी कोरोना लसीकरण देण्यास सुरूवात केली आहे, तर भारतात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे
कोरोना व्हायरसमुळे २०२० हे वर्ष संपूर्ण जगावर संकट घेऊन आलं, कोट्यवधी लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले तर लाखो लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला, या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला, शहरं बंद झाली, माणसं घरात बसली अन् सगळेच व्यवहार ठप्प झाले, कोरोनाच्या दहशतीत अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. जगभरातील वैज्ञानिक कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी दिवसरात्रं मेहनत घेत होते, त्याच्या मेहनतीला यश आलं आणि कोरोनावरील लस तयार झाली.
काही देशांनी कोरोना लसीकरण देण्यास सुरूवात केली आहे, तर भारतात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मात्र कोरोनाची दहशत अद्यापही मानवी जीवनावर कायम आहे. जर थंडीच्या या दिवसात तुम्हाला कोणी सांगितलं की बर्फाच्या पाण्यात आंघोळ करावी लागेल, भले यामुळे कोरोना जाऊ शकतो तर तुम्ही कराल का? जपानवाल्यांनी ते करून दाखवलं आहे. जपानच्या राजधानी टोकियोमध्ये लोकांनी बर्फाच्या पाण्यात आंघोळ केली आहे. याठिकाणी हे धार्मिक आयोजन आहे, ज्याचा उद्देश कोरोनापासून मुक्ती करण्यासाठी प्रार्थना करणं असा आहे.
या बर्फाच्या पाण्यात स्नान करणाऱ्यांनी आपला पारंपारिक पोशाख परिधान केला होता, त्यांनी पहिल्यांदा प्रार्थना केली, त्यावेळी टोकियोमध्ये ५.१ डिग्री सेल्सिअस तापमान होते, यात १२ जणांनी सहभाग घेतला होता, ज्यात ३ महिलांचाही समावेश आहे. या कार्यक्रमाचं नियोजन करणारे शिंजी ओओई म्हणाले की, मी यावेळी जगाच्या भल्यासाठी प्रार्थना केली आहे. लवकरात लवकर जगातून कोरोना महामारी संपुष्टात येवो आणि लोकांनी पुन्हा एकदा आनंदाने जीवन जगावे ही आमची इच्छा आहे.
लोकांनी यावेळी कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क घातलं होतं, पहिल्यांदा लोकांना वार्मअप करण्यात आला, त्यानंतर हे बर्फाच्या पाण्यात गेले आणि प्रार्थना केली, एका सदस्याने सांगितले की, या कार्यक्रमात अनेकजण सहभागी होतात परंतु यंदा फक्त १२ जण होते, पाणीही खूप थंड होतं, रविवारी जपानमध्ये कोरोनाचे १ हजार ४९४ नवे रूग्ण आढळले आहेत.