लस घेण्यासाठी पत्नी पोहोचली केंद्रावर; भीतीपोटी नवरोबा आधार कार्ड घेऊन थेट चढले झाडावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 11:26 AM2021-06-27T11:26:48+5:302021-06-27T11:27:06+5:30
कोरोना लसीची भीती असल्यानं लस घेण्यास नकार; मध्य प्रदेशातला अजब प्रकार
राजगढ: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग देण्याची आवश्यकता आहे. अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून लसीकरण अभियानानं वेग घेतला आहे. मात्र काही ठिकाणी लसीकरण मोहिमेत अफवांमुळे अडथळे येत आहेत. त्यामुळे अनेक जण लस घेण्यात टाळाटाळ करत आहेत. मध्य प्रदेशातल्या राजगढमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे.
पत्नीनं कोरोना लस घेऊ नये म्हणून पती तिचं आधार कार्ड घेऊन झाडावर चढल्याचा प्रकार राजगढमध्ये घडला आहे. पाटन कला गावात घडलेल्या या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. लस टोचली जाऊ नये म्हणून एक तरुण लसीकरण केंद्राच्या जवळ असलेल्या झाडावर जाऊन बसला. लसीकरण केंद्रावरील लसींचा साठा संपेपर्यंत तरुण झाडावरच बसून राहिला. कंवरलाल असं या तरुणाचं नाव आहे.
ग्रामस्थांनी कंवरलालला लसीकरणासाठी येण्याचा आग्रह केला. मात्र लसीबद्दल मनात भीती असल्यानं त्यानं नकार दिला. पत्नीलादेखील त्यानं लस घेण्यास जाऊ नको असं बजावलं. मात्र ग्रामस्थांनी तिची समजूत काढली. पत्नी लस घेण्यासाठी केंद्रावर पोहोचल्याची माहिती मिळताच कंवरलाल घराबाहेर पडला. त्यानं सोबत पत्नीचं आधार कार्ड घेतलं होतं. पत्नीचं आधार कार्ड घेऊन तो झाडावर चढून बसला आणि लसीकरण केंद्रावरील लसींचा साठा संपल्यावर खाली उतरला.