Coronarvirus : पैसे संपले, फ्लाईट्सही बंद; हनीमूनला गेलेली जोडपी अडकली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 02:30 PM2020-03-28T14:30:15+5:302020-03-28T14:43:33+5:30
कोरोनाचा प्रभाव वाढण्याआधी हनीमूनसाठी गेलेली भारतातील 27 नव्याने लग्न झालेले कपल्स इंडोनेशियात अडकले आहेत.
कोरोना व्हायरसचं थैमान जगभरात सुरूच आहे. जगातले अनेक देश लॉकडाउन करण्यात आले आहेत. अब्जो लोकांनी स्वत:ला घरांमध्ये बंद करून घेतलं आहे. भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी अचानक लॉकडाउन करण्यात आल्याने अनेकांच्या समस्या वाढल्या. जागतिक धोक्यामुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली आहे. याचा फटका हनीमूनला गेलेल्या नव्या जोडप्यांना देखील झाला आहे.
कोरोनाचा प्रभाव वाढण्याआधी हनीमूनसाठी गेलेली भारतातील 27 नव्याने लग्न झालेले कपल्स इंडोनेशियात अडकले आहेत. इंडोनेशियातील बाली या जगप्रसिद्ध बेटावर ते अडकून बसले आहेत. त्यामुळे इतर त्यांच्या कुटूंबियांना त्यांची चिंता सतावत आहे.
कोरोनामुळे लॉकडाउन करण्याआधीच हे कपल्स हनीमूनसाठी इंडोनेशियात गेले होते. पण आता फ्लाइट बंद करण्यात आल्याने हे लोक तिकडेच अडकले आहेत. आता त्यांच्या कुटुंबियांनी केंद्र सरकारकडे मदतीसाठी धाव घेतली आहे.
इंडोनेशियातही कोरोनाचा फटका बसला आहे. याचा प्रभाव या भारतीय कपल्सवरही बघायला मिळत आहे. कोरोनामुळे येथील सर्व हॉटेल्स रिकामी करण्यात आली आहेत. त्यामुळे या कपल्सचे राहण्याचे वांदे झाले आहेत.
गेल्या 13 मार्चला ही जोडपी हनीमूनसाठी इंडोनेशियाला रवाना झाली होती. मलिंडो एअरलाइन्सने ही जोडपी इंडोनेशियाला पोहचली होती. पण आता त्यांची फारच गैरसोय होत आहे. या 27 कपल्समध्ये राजस्थान, जयपुर, हैदराबाद, केरळ, पंजाब, आंध्र प्रदेश, मुंबई, पुणे, दिल्ली, तमिळनाडु, मोहाली, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील कपल्सचा समावेश आहे.
आता अनेकांकडचे पैसेही संपले आहेत. त्यांना कशाप्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे हे दाखवणारे व्हिडीओ या कपल्सनी त्यांच्या कुटूंबियांना पाठवले आहेत. त्याद्वारे कुटुंबियांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे.