CoronaVirus: 5 स्टार हॉटेलमध्ये राहणार रस्त्यावरील गरीब; सरकारच्या निर्णयाने मिळाला मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 04:17 PM2020-04-01T16:17:10+5:302020-04-01T16:17:49+5:30
सगळ्यात जास्त लॉकडाऊनचा फटका बसतोय तो म्हणजे हातावर पोट असलेल्या लोकांना.
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरातील लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागून जगण्यासाठी लढावं लागत आहेत. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुद्धा जाहिर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये लहान मोठ्या सर्वत्र उद्योजकांना, व्यापारी वर्गाला नुकसानाला सामोरं जावं लागत आहे. सगळ्यात जास्त लॉकडाऊनचा फटका बसतोय तो म्हणजे हातावर पोट असलेल्या लोकांना. प्रत्येक देशात आपल्या देशातील समस्या कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
अशा परिस्थितीत एका देशाने अनोखा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत रस्त्यावर राहत असलेल्या आणि हक्काचा निवारा नसलेल्या लोकांना 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसपासून या गरिब लोकांचा बचाव व्हावा यासाठी हे पाऊल उचललं आहे.
ऑस्ट्रेलियामधील पर्थमध्ये हा प्रकार घडणार आहे. या ठिकाणी रस्त्यावर झोपत असलेल्या लोकांना महागड्या हॉटेल्समध्ये शिफ्ट केलं जाणार आहे. या हॉटेलचं एका दिवसाचं भाडं २० हजार रुपये इतकं आहे. ही योजना राबवण्याची तयारी पश्चिमी ऑस्टेलियातील सरकारने केली आहे. या अंतर्गत जवळपास १ महिना रस्त्यावर निवास असलेल्या लोकांना ५ स्टार हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. सुरूवातीला जवळपास २० लोकांना पॅन पॅसिफिक या हॉटेलमध्ये ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारने या प्रकल्पाला विद हार्ट हे नाव दिलं आहे. यादरम्यान ऑस्टेलिया सरकार अशा लोकांचा शोध घेत आहेत. जे स्वतःचं विलगीकरणं करू शकत नाहीत. त्यानंतर या प्रकल्पात घरगुती हिंसाचाराचा सामना करत असलेल्या आणि मानसिक संतुलन बिघडलेल्यांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. यासाठी १२० खोल्याचा वापर केला जाणार आहे. कोरोनाच्या संक्रमणापासून बचावासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. याद्वारे इतर सेवांवर पडणारा भार कमी होईल.