coronavirus: प्रेमासाठी काय पण! लॉकडाऊनदरम्यान तिच्यासाठी त्याने मुंबईवरून गाठले मालवण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 05:52 PM2020-05-04T17:52:25+5:302020-05-04T17:56:11+5:30
लॉकडाऊनमुळे विरह सहन करावा लागत असल्याने अनेक प्रेमी जोडप्यांची अवस्था मधू इथे अन् चंद्र तिथे अशी झालेली आहे.
सिंधुदुर्ग/ रत्नागिरी - गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान, या लॉकडाऊनचा फटका अनेक जणांना बसला असून, अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे विरह सहन करावा लागत असल्याने अनेक प्रेमी जोडप्यांची अवस्था मधू इथे अन् चंद्र तिथे अशी झालेली आहे. अशाच एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी मुंबईवरून थेट मालवण गाठले. चालत, लपत छपत तो मालवणला पोहोचला. तिथे प्रेयसीची भेट घेत तिला सोबत घेऊन परत येत असताना हे दोघेही प्रशासनाच्या तावडीत सापडले आणि या सर्व प्रकाराचे बिंग फुटले.
एखाद्या भन्नाट प्रेमकथेला लाजवेल असा हा प्रकार समोर आला आहे. राज्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असताना कोरोना, पोलीस यापैकी कशाचीही भीती न बाळगता हा प्रियकर थेट मुंबईहून चालत, लपून छपून पोलीस आणि प्रशासनाचा पहारा चुकवून आडवाटेने तो प्रेयसीच्या गावी पोहोचला. तिथे गेल्यावर त्याने प्रेयसीची भेट घेतली. तसेच सदर युवतीच्या घराशेजारी असलेल्या घरात त्याने वास्तव्य केले. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या योजनेप्रमाणे हा तरुण सदर युवतीस सोबत घेऊन तिच्या कुटुंबीयांचा निरोप घेऊन मुंबईत येण्यास निघाला.
यादरम्यान, मालवण आणि सिंधुदुर्गातील प्रशासनाला गुंगारा देत तो रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचला. मात्र जाताना सहजपणे गावी गेलेला हा तरुण मुंबईत येताना मात्र लांजा पोलिसांच्या तावडीत सापडला. त्यानंतर पोलिसांन या प्रियकर प्रेयसीची रवानगी लांजा येथील क्वारेंटाइन सेंटरमध्ये केली आहे.
तसेच सदर तरुण हा मुंबई म्हणजेच कोरोनाच्या रेड झोनमधून आलेला असल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या युवतीचे कुटुंबीय आणि या कुटंबाच्या घराशेजारील अजून तीन घरातील मिळून एकूण ३४ जणांना सिंधुदुर्गातील आरोग्य विभागाने होम क्वारेंटाइन केले आहे.