भारतीयांचा जुगाड! आता लग्नात नातेवाईकांच्या शिफ्ट्स; प्रत्येकासाठी वेळ फिक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 05:48 PM2020-06-12T17:48:53+5:302020-06-12T17:49:40+5:30

लग्नासाठी ५० पाहुण्यांची मर्यादा असल्यानं अनेकांनी शोधला जुगाड

coronavirus invitations will be given in two shifts for marriage | भारतीयांचा जुगाड! आता लग्नात नातेवाईकांच्या शिफ्ट्स; प्रत्येकासाठी वेळ फिक्स

भारतीयांचा जुगाड! आता लग्नात नातेवाईकांच्या शिफ्ट्स; प्रत्येकासाठी वेळ फिक्स

googlenewsNext

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन यामुळे एप्रिल-मे महिन्यातील अनेक विवाह सोहळे रद्द झाले. यानंतर आता अनेकांनी जूनमध्ये दोनाचे चार हात करण्याची तयारी सुरू केली आहे. जूनमध्ये लग्नाचे सहा मुहूर्त होते. त्यातील पाच मुहूर्त राहिले आहेत. एका लग्नाला केवळ ५० जणच उपस्थित राहू शकतात, असा नियम आहे. मात्र या नियमाला बगल देण्यासाठी आता वेगवेगळे जुगाड करण्याचा प्रयत्न होत आहे. 

लग्नात जास्तीत जास्त पाहुण्यांना उपस्थित राहता यावं यासाठी पंजाबमधील काही जणांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. नातेवाईक आणि मित्रांना शिफ्टमध्ये बोलावण्याची योजना आखण्यात आली आहे. शाकाहारी जेवणास प्राधान्य देणाऱ्यांना ४ ते ६ या वेळेत बोलावलं जात आहे. त्यांच्यासाठी राजमा, चावल, पनीर असा बेत आहे. तर रात्री ६ ते ८ या वेळेत मांसाहारी जेवण आवडणाऱ्यांना निमंत्रित केलं जात आहे. त्यांच्यासाठी मटन, चिकन, कबाब आणि दारूची व्यवस्था करण्यात आली आहे. पाहुण्यांनी लग्नात ३० ते ४५ मिनिटंच थांबावं, अशी विनंतीदेखील करण्यात येत आहे. 

अनेकांनी यासाठी जिल्हा प्रशासनाकडे रितसर परवानगी मागितली आहे. यामुळे लग्न समारंभात गर्दी कमी होईल. याशिवाय सर्वांनाच यामध्ये सहभागी होता येईल, असा दावा करण्यात येत आहे. यासाठी आतापर्यंत ११ जणांनी जालंदर जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. मॉडेल टाऊनचे रहिवासी असलेल्या राकेश शर्मांनी अशाच प्रकारचा अर्ज केला आहे. त्यांच्या बहिणीच्या मुलाचं २७ जूनला लग्न आहे. या सोहळ्यात पाहुण्यांना दोन शिफ्टमध्ये बोलावण्याची परवानगी त्यांनी प्रशासनाकडे मागितली आहे. 

नागरिकांनी सर्व नियमांचं पालन करून लग्न सोहळ्यांचं आयोजन करावं, असं जालंधरचे उपायुक्त वरिंदक कुमार शर्मांनी सांगितलं. लोकांनी नियमांच्या चौकटीत राहावं. तसं केल्यास कोणतीही अडचण येणार नाही. समारंभात ५० पेक्षा जास्त पाहुणे उपस्थित राहता कामा नये. या नियमांचं काटेकोरपणे पालन व्हायला हवं, असं शर्मा म्हणाले. 
 

Web Title: coronavirus invitations will be given in two shifts for marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.